रायगड : १७ मे – तौत्के चक्रीवादळानं कोकणातील समुद्र किनाऱ्यावर अक्षरश: थैमान घातल्याचं पाहायला मिळतंय. रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. शेकडो झाडं कोसळली आहेत. हजारो घरांचं नुकसान झालंय. तर चक्रीवादळाच्या तडाख्यात २ महिलांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दुपारी रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर ४ मीटरपर्यंत लाटा उसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. ताशी ५० ते ६० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे रायगडमध्ये तौत्के चक्रीवादळानं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आता समोर येत आहे.
उरण परिसरात एक भिंत पडून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. उरणच्या बाजारपेठेत भिंत पडल्यानं भाजी विक्री करणारी महिला निता भालचंद्र नाईक आणि सुनंदाबाई भालचंद्र घरत यांचा मृत्यू झाला आहे. तर ८०० पेक्षा जास्त घरांना आणि पत्र्याच्या शेडचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. १७ ठिकाणी झाडं उन्मळून पडल्यानं महामार्ग बंद झालेत. पडलेली झाडं बाजूला करुन रस्ते वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरु आहे. श्रीवर्धन आणि मुरुड तालुक्यात कालपासून वीज प्रवाह खंडीत झालाय. तर रोहा, महाड आणि अलिबागमध्ये काही ठिकाणी वीज प्रवाह खंडीत करण्यात आलाय.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवरील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर करणयात आलंय. तीन जिल्ह्यात मिळून एकूण १२ हजार ४२० नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आल असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागानं दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. आज दुपारी मुख्यमंत्री राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीतही आढावा घेणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील ३ हजार ८९६,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४४ आणि रायगड जिल्ह्यातील ८ हजार ३८० लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे, मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या बचाव व मदतकार्यासाठी संबंधित जिल्हा व राज्य प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.