चक्रीवादळाचा मुंबईवर भीषण परिणाम, मुंबई तुंबली, अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प

मुंबई : १७ मे – तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईसह राज्यभरात हाहाकार माजला आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा तुंबली आहे. अनेक उपनगरांमध्ये पाणी साचल्याने वाहतूकही ठप्प झाली आहे. अशात रेल्वे वाहतूकीवरही चक्रीवादळाचा भीषण परिणाम झाला आहे. याचा एक धक्कादायक व्हिडिओही समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर-विक्रोळी ठाण्याकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे. ओव्हरगहेड वायरवर झाड पडल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यावेळी पावसामुळे ओव्हरहेड वायरचा स्फोटही झाल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. यामुळे कामावर आणि घरी जाणाऱ्या नागरिकांचा खोळंबा झाला आहे.

दरम्यान, तौक्ते चक्रीवादळाचा मुंबईला कोणताही धोका नसला तरी हवामान विभागानं मुंबई व परिसराला ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईला वादळाचा धोका नसला तरी हे चक्रीवादळ मुंबईनजीकच्या समुद्रातून जाणार असल्याने त्याच्या प्रभावाने मुंबईत पाऊस होण्यासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, पालघरला ऑरेंज अलर्ट व तर, रायगडला रेड अलर्ट देण्यात आला आहे.
सोमवारी तौक्ते चक्रीवादळाचा रायगड, मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला समांतर समुद्रातून प्रवास होणार असून, वादळाच्या वाढत्या तीव्रतेमुळे प्रशासनातर्फे या पट्ट्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्याला रेड अॅलर्ट जारी केल्यामुळे जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

यामुळे नागरिकांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. नागरिकांनी आज व उद्या घरातच राहावे. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. समुद्र किनारी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत रस्त्याच्या कडेला वा वस्तीत धोकादायक स्थितीत होर्डिंग असल्यास ते हटवण्याची सूचनाही संबंधितांना देण्यात आली आहे.

Leave a Reply