भोपाळ : १७ मे – आपल्या वक्तव्यांनी नवनवे वाद सुरू करून देण्याची भाजपच्या नेत्यांची परंपरा अखंड सुरू आहे. वेळकाळाचं भान न राखता सार्वजनिकपणे वक्तव्य करून वाद निर्माण करणारे अनेक नेते भाजपमध्ये आहेत त्यापैकी एक मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर. त्यांनी आता नवं वक्तव्य करून वादाला तोंड फोडलं आहे.
‘गोमूत्र अर्क प्यायल्याने फुफ्फुसांतील संसर्ग दूर होतो. मी दररोज गोमूत्र अर्क पिते त्यामुळे मला कोरोना झालेला नाही. म्हणून प्रत्येकाने देशी गाय पाळली पाहिजे आणि गोमूत्र प्यायला पाहिजे,’ असं मत प्रज्ञासिंह यांनी केलं आहे. डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यासाठी त्या आल्या होत्या त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.
त्या म्हणाल्या, ‘कोरोना महामारीच्या प्रकोपात सगळ्यांनीच खूप सावध रहायला हवं. सरकारने घालून दिलेल्या कोरोनासंबंधी नियमांचं सगळ्यांनी कसोशीने पालन करायला हवं.’ जगभरातले शास्रज्ञ कोरोनावरील लस आणि कोविड-19 च्या विषाणूच्या नवनवीन रुपांवरील उपाय शोधण्यासाठी प्रयत्नशील आहेत. एकीकडे ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता जाणवत आहे, सरकारी यंत्रणा नागरिकांना सुविधा पुरवण्यास अपुऱ्या पडत आहेत अशात अशी वक्तव्य जाहीर कार्यक्रमात केल्यामुळे लोकांमध्ये भ्रम निर्माण होऊ शकतो याचंही भान प्रज्ञा यांना राहिलं नाही. सध्या वेगवेगळ्या व्हिडिओंमधून आयुर्वेदिक उपचार सुचवले जाता आहेत घरगुती उपचार सुचवले जात आहेत त्यामुळे वाढणाऱ्या संभ्रमात भर घालण्याचं काम लोकप्रतिनिधींनी करू नये. साध्वी प्रज्ञा यांच्या या वक्तव्यावर आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.