नवी दिल्ली : १७ मे – केंद्रातील मोदी सरकारशी झालेल्या मतभेदानंतर देशातील प्रसिद्ध आणि ज्येष्ठ संसर्गतज्ज्ञ (विषाणूशास्त्रज्ञ) शाहीद जमील यांनी केंद्रानं गठीत केलेल्या वैज्ञानिकांच्या सल्लागार समितीचा (INSACOG) राजीनामा सोपवला आहे. करोना विषाणूच्या वेगवेगळ्या रुपांचा (जिनोम स्ट्रक्चर) शोध घेण्यासाठी जानेवारीत या समितीचं गठन करण्यात आलं होतं.
शाहीद जमील हे अशोक विद्यापीठातील ‘त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्स’चे संचालकही आहेत. ‘आपण राजीनामा दिला आहे, तसंच या प्रकरणात आता काहीही बोलण्यासारखं उरलेलं नाही’, अशी प्रतिक्रिया शाहीद जमील यांनी दिली. वैज्ञानिकांच्या सल्लागार समिती ही समिती बायोटेक्नॉलॉजी विभागाअंतर्गत गठीत करण्यात आली होती. सरकारच्यावतीनं यासंदर्भात अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
वैज्ञानिकांच्या सल्लागार समितीने सरकारला करोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भात मार्च महिन्यातच धोक्याचा इशारा दिला होता, अशी माहिती मिळतेय. करोना विषाणूचं B.1.617 हे स्वरुप भारतात करोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेला अत्यंत भयंकर स्वरुप देण्याला कारणीभूत ठरल्याचं समजलं जातंय. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, करोना विषाणूचं हा व्हेरियंट ४४ हून अधिक देशांमध्ये पसरला आहे.
यापूर्वी, जमील यांनी करोना संकटाशी निपटण्याच्या सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. देशात करोना संक्रमणाची दुसरी लाट उसळलेली असताना शाहीद जमील यांचा राजीनामा अतिशय धक्कादायक आहे.
शाहीद जमील यांच्या निमित्तानं देशात पहिल्यांदाच करोनायुद्धात सहभागी असलेल्या एखाद्या व्यावसायिक व्यक्तीनं उघड-उघड केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध मत व्यक्त केलंय.
काही दिवसांपूर्वी, शाहीद जमील यांचा ‘न्यूयॉर्क टाईम्स’ या वर्तमानपत्रात एक लेख प्रसिद्ध झाला होता. जमील यांनी या लेखात करोनामुळे देशात निर्माण झालेली स्थिती आणि उपाययोजना यांवर आपलं मत व्यक्त केलं होतं. तसंच करोना संकटाशी दोन हात करताना केंद्र सरकारच्या धोरणावर काही प्रश्नचिन्हही उपस्थित केले होते. कोविड विरुद्ध रणनीती ठरवताना केंद्र सरकारनं अडीग वृत्ती सोडावी, असा सल्लाही जमील यांनी दिला होता.
३० एप्रिल रोजी भारताच्या शास्त्रज्ञांनी पंतप्रधानांकडे डेटा उपलब्ध करुन देण्याची विनंती केली होती. या डाटावरून विषाणूचा अभ्यास करून पुढील मार्ग आणि विषाणूवर मात करण्यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी शास्त्रज्ञांना डेटाची गरज होती. परंतु, भारतात जेव्हापासून करोना अनियंत्रित झाला तेव्हापासून डेटाच्या आधारे निर्णय घेण्याचीही तसदी घेतली जात नाही, असंही यात डॉ. जमील यांनी म्हटलं होतं.
देशात सध्या दररोज जवळपास ४,००० हून अधिक मृत्यू होत आहेत. कित्येक दिवस दररोज चार लाखांचा आकडा ओलांडल्यानंतर सोमवारी हा आकडा तीन लाखांच्या खाली आलेला दिसतोय. याच दरम्यान, केंद्र सरकारच्या धोरणांवर विरोधी पक्षांकडून आणि सामाजिक संघटनांकडून जोरदार टीका होतेय.