नागपूर : १६ मे – नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस स्टेशन हद्दीत 3 हार्डकोर गुन्हेगारांना शस्त्रासह अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. हे गुन्हेगार वेगवेगळ्या भागात शस्त्र घेऊन फिरत. लोकांसमोर हातात शस्त्र दाखवून दहशत पसरविण्याच काम करत होते. मात्र, पोलिसांनी वेळीच त्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या या कारवाईचं शहरात कौतुक केलं जात आहे. संबंधित आरोपीचं दहशत माजविण्यामागे काय उद्देश होता, ते कुठला कारनामा करणार होते याचा शोध पोलीस घेत आहेत
यशोधरा नगर भागात काही गुन्हेगार शस्त्र घेऊन दहशत माजवत फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पेट्रोलिंग व्हॅनच्या साहाय्याने या आरोपीनाचा शोध घेतला आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या. यापैकी दोन जण तलवार घेऊन तर एक चाकू हातात घेऊन फिरत होता. यातील दोन आरोपी हे कुख्यात गुंड आहेत तर एक नवीन आहे. मात्र तिघंही शस्त्र घेऊन परिसरात दहशत माजवत होते. त्यांच्याकडून शस्त्र आणि इतर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या घटनेबाबत यशोधरा नगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अशोक मेश्राम यांनी प्रतिक्रिया दिली. “माझा नाईट राऊंट होता. दरम्यान रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास शहरातील तीन वेगवेगळ्या चौकांवर तीन इसम प्राणघातक शस्त्र घेऊन फिरत आहेत, अशी माहिती मिळाली. त्या माहितीची आम्ही खात्री केली. त्यानंतर तिन्ही ठिकाणी पथकं रवाना केले. त्यानंतर ते तीनही संशयित असून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं लक्षात आलं”, असं मेश्रान यांनी सांगितलं.
“आम्ही तातडीने घटनास्थळी दाखल झालो. त्या तीनही आरोपींना पकडलं. त्यांची झळती घेतली. तेव्हा त्यांच्याकडे शस्त्रास्त्रे सापडले. तीनही आरोपींवर आम्ही कारवाई केली आहे. त्यांनी तलवारी, चाकू नेमके कुठून आणले याचा तपास सुरु आहे”, असं अशोक मेश्राम यांनी सांगितलं.