सोशल मीडियाने केले अंडी चोरणाऱ्या पोलिसाला निलंबित

चंदिगड : १६ मे – सोशल मीडिया हे दुधारी हत्यार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्यापर्यंत मदतीचा हातही पोहोचतो. एखाद्या गुन्हेगाराला शिक्षाही होते. तसेच चुकीच्या बातम्यांमुळे एखाद्याला त्रासही सहन करावा लागतो. मात्र पंजाबमधील एका पोलीस शिपायाला चांगलीच अद्दल घडली आहे. पंजाबमधील पोलीस शिपायाला त्याच्या कृत्यासाठी शिक्षा मिळाली आहे. त्याचा अंडी चोरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने याची दखल पोलीस अधिकाऱ्यांना घ्यावी लागली. कारवाई अंतर्गत पोलिसांनी अंडीचोर पोलीस शिपायाचं निलंबन केलं आहे.
पंजाबमधील फतेगड साहिब पोलीस ठाण्यातील प्रीतपाल सिंग हा पोलीस शिपाई अंडी चोरत असताना व्हिडिओत चित्रित झाला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर बघता बघता वाऱ्यासारखा पसरला. अंडी घेऊन जाणारा मालक जागेवर नसल्याचा फायदा हा पोलीस शिपाई घेताना व्हिडिओत दिसत आहे. अंड्याच्या ट्रेमधून तो एक एक करून अंडी खिशात भरताना दिसत आहे. संबंधित प्रकार त्यानंतर आलेल्या अंडी मालकाच्या लक्षात आला नाही. मात्र एका जबाबदार नागरिकाने हा व्हिडिओ चित्रित केला आणि सोशल मीडियावर शेअर केला.
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांचा संताप झाला. त्यांनी लागलीच हा व्हिडिओ शेअर करण्यास सुरुवात केली. अनेकांनी पोलिसाच्या कृत्याचा निषेध करत कडक कारवाई करण्याची मागणी केली. हा व्हिडिओ अखेर वरिष्ठांकडे पोहोचला आणि त्यांनाही या कृत्याची लाज वाटली. अखेर त्यांनी अंडीचोर पोलीस शिपायाचं निलंबन केलं आहे. याबाबत पंजाब पोलिसांनी ट्वीटर माहिती दिली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेनंतर तात्काल पोलीस शिपायावर कारवाई केली आहे. त्याचं निलंबन केलं असून विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply