सडेतोड – वीरेंद्र (भाई) देवघरे

वळसाईत

पीडब्ल्युडी च्या कॉमन आॅफिस मध्ये तुम्ही गेलात तर आत गेल्यावर समोर दिसणा-या कोप-यातील डाव्या हाताला, बसतात तेच्, तेच् बिलांच्या स्कृटिनी चे टेबल म्हणजे अभियंता वळसाईत.
डोक्याला फक्त पांढ-या केसांची झालर, गोल चष्मा काळ्या फ्रेमचा, गोल चेहरा, छोटिसी बारीक मिशी, गव्हाळी सावळा रंग. चेह-याचा रुबाब सांगतोय कष्टिक जीवनातून चाललाय.चेहरा कर्मठ, कर्तव्यनिष्ठ. क्षमतेपेक्षा कमी काम मिळालेय.बसल्या जागेत, काम आली की कामाचा फज्जा उडवायचा. काम संपवून, शांतपणे कपात चहा पित पित, मजेत आॅफिसचा दिवस संपवायचा.
बसायच्या जागेत टेबल त्याने “L” शेप मध्ये लावलेले. समोरचे टेबल आॅफिस कामाचे, तो टेबल त्याने समोर पडदा टाकुन पुर्णपणे झाकून टाकलेला,तर साईड टेबल भिंती लगत, त्यावर नेहमीच चहाचा थर्मॉस, एक दोन कपं, पाण्याचा ग्लास,जेवणाचा डबा, टिश्यू पेपर तर डाव्या हाताला, हात पोहोचेल अशा अंतरावर एक आॅफिस फाईली ठेवण्याची आलमारी, अशा खाक्यात वळसाईत चा आॅफिसी सरंजाम मांडलेला. बोलायला अबोल, कामाशी काम, बोलेल फक्त कामाचे. ह्याच्याकडे जायला दोन दिवस उशीर जरी झाला तरी कामात बाधा नाही. सांगणार बिल स्कृटिनी आटोपले आणि पुढे पाठवले आहे, मात्र पुढच्या टेबलावर तुम्ही गेल्याशिवाय काम होणार नाही. असे म्हणुन गालात मिश्किल हसणारा वळसाईत.
मनाचा थांग न लागु देणारा वळसाईत, आॅफिस मध्ये त्याच्याबद्दल कधी उलटसुलट चर्चा ऐकली नाही, पण दुस- या टेबलावर चर्चा निघाली तरी “वळसाईतचे” नाव आदरपूर्वक घेतले जायचे. अगदी सर्वांना वळसाईतचा आदर होता, पण मला सारखे वाटायचे वळसाईत, दिसायला वरकरणी जरी साधा सोप्पा असला तरी जीवनाच्या कुपीत, कुठेतरी दुखावलेली व्यक्तिरेखेनं दडवलेलं गुपित आहे.
मी प्रत्येक वेळी जेव्हा केव्हा ह्याच्या टेबलवर कामानिमित्त जायचो, पठ्ठा खुलायचाच् नाही. फक्त कामाशी काम, कामाचं बोलायचं आणि समोरच्याला पुढल्या टेबलावर पिटाळायचं. ह्या खाक्यात जगणारी व्यक्तिरेखा म्हणजे वळसाईत.
खुर्चीत बसला की दिसायला भारदस्त, बसल्या ठिकाणी ह्याचे जेवण, चहापान, पाणी आणि तंबाखू घोटून खायची सवय. पठ्ठा तंबाखू घोटून खायचा आणि पहिली पिंक गिळायचा. कधी ही तंबाखू खाऊन इकडे तिकडे पिंक मारली कधीच नाही. वळसाईत साहेबांना बोलते करण्याचा खूप प्रयत्न केला. पण परिणाम शुन्य, बहुतेक सगळ्यांसमोर कॉमन अॉफिसमध्ये असले विषय चघळायचे, त्यांना पटत नसावे. तो मला नेहमी “अभियंता” ह्या नावाने खास लकबीत आवाज द्यायचा.
पावसाळ्याचे दिवस, मी बिल आॅफिसला दिले होते. मेघांनी संपूर्ण आकाश झाकोळलं होतं. साधारण दुपारी तीन साडेतीन ची वेळ असावी. सहज एक चान्स घ्यावा म्हणून पीडब्ल्युडी च्या आॅफिसला आलो तर धुवांधार पावसाच्या भितीने सगळा स्टाफ गायब, कॉमन आॅफिसची खोली पुर्ण रिकामी. आणि कोप-यातल्या नेहमीच्या टेबलवर एकटा वळसाईत. “अभियंता” त्याने नेहमीच्या लकबीत आवाज दिला. या बसा, चहा घ्या, असे म्हणुन त्याने दोन कप चहा थर्मॉस मधुन ओतला सुद्धा.बहुतेक तो एकटा असल्याने, एकटे पणाला विरंगुळा म्हणून मिळालेली संधी त्याला दवडायची नव्हती. आम्ही दोघे ही गप्पा मारत चहा संपवला, म्हटले चला वळसाईत साहेब, सोडून देतो तुम्हाला. वळसाईतच्या मनात चलबिचल झाली. म्हणाला नको नको एक दोन काम आहेत. बाहेर जोराचा वारा एव्हाना सुरू झाला होता, वादळाचे रुप घेत होता आणि महामहिम एमएसईबी च्या तारांनी, वादळात दम तोडला आणि लाइट्स गेले.
वळसाईत साहेब चला आता लाईट पण गेले. अभियंता बसा, नेहमीची लकब – वळसाईत साहेबांनी परत दोन चहाचे कप भरले. मी त्यांच्यासमोर खुर्चीत बसलो, चहाचा कप हातात घेतला. वळसाईत साहेब म्हणाले माझा मुलगा येईल मला घ्यायला “व्हील चेअर” घेवून. शब्द ऐकले आणि खुर्चीत दोन फुट उडालोच!!!!!
दीड वर्ष आपण येतोय इथं पण पठ्ठ्यानं थांग लागु दिला नव्हता. म्हणजे????? माझा प्रश्नार्थक चेहरा! माझा चेह-याचे भाव हेरले त्याने आणि म्हणाला हो मला गुडघ्याखाली दोन्ही पाय नाहीत. सकाळी फक्त मुलगा येतो, खुर्चीत बसवतो आणि संध्याकाळी त्याच्या आॅफिसमधुन वापस येताना मला घेऊन जातो. वळसाईत आज खुलला होता, मी ज्या संधीची वाट बघत होतो, ती संधी चालून आली होती. वळसाईतला मी अजून बोलता करायचा प्रयत्न केला. नाही म्हणजे वळसाईत साहेब, हे झालं कसं?
वळसाईत आता बोलता झाला, मनातला कढ मोकळा करायची ही चांगली वेळ कदाचित कारण आॅफिस रिकामे, तिथे फक्त आम्ही दोघेच.
वळसाईत साहेब सांगु लागले, म्हणाले माझी ६-७ वर्षाची नोकरी झाली असेल. ज्युनिअर इंजिनिअर गजभिये नवीन नवीन नोकरीला लागला. प्रत्येक गोष्टीसाठी लहान सहान चुकांसाठी माझ्याकडे यायचा. मी सुद्धा लहान भावाप्रमाणे ह्याला पीडब्ल्युडी चे कित्ते गिरवीत होतो. बघता बघता काही वर्षांतच् हा ३५ टक्क्यांनी पास इंजिनिअर, ह्या ९५% नी पास इंजिनिअर ला मागे टाकून सरकारी रिवाजाप्रमाणे माझा बॉस झाला. कार्यकारी अभियंता झाला आणि मी त्याच्या हाताखाली काम करायला बाध्य झालो. वळसाईत नी आवंढ्या चहाचा घोट गिळला आणि परत बोलता झाला.
काही कामानिमित्त मी कार्यकारी अभियंता गजभिये च्या केबिनमध्ये गेलो, त्यांना फाईल दाखवली, तर त्याच्या खोलीत २-३ तत्सम कार्यकारी अभियंता बसले होते. त्यांच्या वर रोब जमवायच्या धुंदीत, ह्या माझ्या हाताखाली काम करणा-या ३५% पास कार्यकारी अभियंता गजभिये नी फाईल व्यवस्थित लिहुन आणा, दोन चार लाल रेघोट्या फाईलवर मारुन, आता ह्या वयात तुम्हाला शिकवावे लागेल का? असे म्हणुन फाईल फेकून दिली. माझा अपमान झाला.
वळसाईत परत एकदा तो अपमान जगत होता. मुठी आवळल्याच्या पावित्र्यात त्याने खुर्ची चे दोन्ही हात घट्ट पणे हाताने आवळले होते. त्यामुळे हाताच्या नसा तटतटुन फुगल्या, मानेची नस फुगुन वर आली आणि कपाळावरची नस आणिक मोठी झाली आणि स्पष्ट पणे दिसायला लागली. डोळे लाल झाले, दोन अश्रू डोळ्यात जमा झाले. स्वाभिमानी वळसाईत ने डाव्या हाताने चष्मा काढला, उजव्या हाताने रुमाल घेतला, डोळ्यातील अश्रू ना तंबी दिली, असं सांडायचं नाही. अश्रू पुसले, चष्मा लावला आणि सांगु लागले. त्या अपमान जनक स्थितीत ३५ टक्क्यांनी पास कार्यकारी अभियंता ने फेकलेली फाईल उचलली आणि तडक मोटरसायकल काढली आणि साईटवर जायला निघालो. डोक्यात अपमानानं काहुर माजलेलं, मेंदु मध्ये तडक घुसलेली, मी का असा अपमान सहन करावा? ज्या बच्च्याला मी शिकविले त्यानी माझे वय आणि लायकी काढावी. डोक्यात विचारांचं काहूर माजलेलं आणि अपमानाचा विखार मनात पेटलेला. अशा परिस्थितीत मी मोटरसायकल चालवत होतो आणि अचानक धडाम् ssssssss एक मोठ्ठा आवाज झाला, मोटरसायकल कुठे आपटली आठवत् नाही, अंधारी आली काय झालं कळलं नाही पण डोळे उघडले तर मी हॉस्पिटलमध्ये, माझे दोन्ही पाय कायम कापावे लागलेले. आठ महिने दवाखान्यात अॅडमिट होतो, त्यानंतर चार महिने घरी फिजिओथेरपी.
वळसाईत ने क्षण दोन क्षणासाठी पॉज घेतला. अंधारलेल्या आॅफिसात पिन ड्रॉप सायलेन्स, मी उत्कंठापुर्वक पुढे काय होणार? हे ऐकायच्या मनस्थितीत संपूर्ण अबोल आणि लाईट गेल्याने संपूर्ण आॅफिस अंधारात.
खरं म्हणजे आलेला आवंढा गिळायला त्याने पॉज घेतला पण मनातील शल्य बाहेर दिसु देईल तर वळसाईत कसला?
चहाच्या घोटाबरोबर परत वळसाईत ने आवंढा गिळला, म्हणाला साधारण वर्षभराने आॅफिस ला आलो. साहेबाला सांगितले, बिल स्कृटिनी चे टेबल मागुन घेतले, ते आजतागायत सुरू आहे.
भारतीय संविधानाची ही बाजू खरंच् काळीकुट्ट आहे. दहा वर्षांसाठी दिलेली सवलत सत्तर वर्ष झाले, मतांच्या गैरवापरासाठी वापरण्यात येते.
त्या १५-२० मिनिटांत जोरात पावसाची सर येवून गेली होती.बाहेर चे वादळ शमले होते. बाहेर परत लख्ख ऊन पडले होते.वळसाईत मात्र अजुनही अंधारलेल्या आॅफिसात व्हीलचेअर ची वाट बघत होता.
मला म्हणाला अभियंता निघा, तुम्ही पण आता, लांबचा पल्ला गाठायचा आहे, अंधार पडायच्या आधी जितके अंतर कापता येईल तितके बरे.
मी दोन मिनिटे तिथेच घुटमळलो, पाणी प्यायलो म्हटले वळसाईत साहेब येऊ मी? त्यांची परवानगी घेतली, आॅफिस च्या दरवाजापाशी आलो, उजवी कडे वळणार्, तर आतुन मोठ्या हुंदक्याचा आवाज आला, बहुतेक वळसाईत नी एकांतात अश्रूंना वाट मोकळी करून दिली असणार ! बाहेर आलो, बाहेर लख्ख प्रकाश होता. माझ्या ड्रायव्हरला हात दाखवून गाडी आणायला सांगितली. माझी कार निघता निघता, एक कार आत शिरण्याचा आवाज आला. बहुतेक हा वळसाईत साहेबांचा मुलगा असावा. ९५% गुण मिळवणारा अभियंता, अंधा-या आॅफिस मध्ये आत्तासुद्धा व्हीलचेअर ची वाट बघतोय. खरंच् वाईट वाटलं, पण …………

भाई देवघरे

Leave a Reply