संपादकीय संवाद – तिसऱ्या लाटेला समोरे जाताना कोरोना फ्रेंडली जीवनशैली स्वीकारणे गरजेचे

कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर देशातील सरकार आणि जनता बेफिकीर राहिल्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता अधिक जाणवली अशी टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी दिल्लीत पॉझिटिव्हिटी अनलिमिटेड या कार्यक्रमात बोलतांना केली आहे. आपण सकारात्मक राहिलो तर तिसऱ्या लाटेलाही सामोरे जाऊन आपण सुखरूप बाहेर पडू शकू असा विश्वास त्यांनी या भाषणात बोलतांना व्यक्त केला आहे.
सरसंघचालकांच्या या वक्तव्यात तथ्य निश्चितच आहे. मात्र जनतेच्या बेफिकिरीबाबत असलेल्या विविध मुद्द्यांचाही विचार केला जाणे गरजेचे आहे. तत्पूर्वी सरकारच्या कथित बेफिकिरीबाबतही भाष्य करणे जरुरीचे वाटते.
कोरोनाची पहिली लाट २०२०च्या मार्च महिन्यात आली, जवळजवळ १०० वर्षांनी अश्या प्रकारच्या महामारीची लाट भारतात आली होती. त्यामुळे लोकनेते, प्रशासन आणि सामान्य जनता यापैकी कुणालाच अश्या महामारीच्या व्यवस्थापनाचा अनुभव नव्हता दुसरे म्हणजे १९२० नंतरच्या १०० वर्षात या देशातील लोकसंख्या तब्बल ५ पटीपेक्षाही जास्त वाढली होती आज या देशात लोकसंख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त नागरिक हे एका हातावर कमवून दुसऱ्या हाताने खात असतात, अचानक आलेल्या महामारीमुळे सरकारला तातडीने लॉक डाऊन लावावा लागला. या लॉकडाऊन मुळे देशातील असे नागरिक अक्षरशः रस्त्यावर आले. तिथेच आर्थिक गणिते बिघडायला सुरुवात झाली. पहिल्या लाटेचा हा प्रभाव दीर्घकाळ टिकला होता. तब्बल सहा महिने अर्थकारण ठप्प झाले होते. त्यामुळे वातावरण निवळते आहे असे दिसताच नागरिकांनी पुन्हा कामाला सुरुवात केली.
या काळात शासकीय स्तरावर वैद्यकीय सुविधा उभारल्या जाणे आणि पुन्हा अशीच परिस्थिती आल्यास नागरिकांना सज्ज कसे राहता येईल याचे नियोजन करणे गरजेचे होते मात्र, इथे शासकीय यंत्रणा आणि राजकारणी कमी पडले हे वास्तव नाकारता येत नाही. आमच्याकडे विरोधकांनी सरकारवर टीका करण्यातच धन्यता मानली त्यामुळे दुसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी सज्जता निर्माण करता आली नाही.
गतवर्षी कोरोना आला तेव्हा हे संकट दीर्घकाळ चालणार आहे असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले होते. त्याचवेळी भविष्यात कोरोनाशी सामना करण्यासाठी कोरोना फ्रेंडली जीवनशैली आत्मसात करावी लागेल असेही सुचवले होते. मात्र आम्ही आजवर कोरोना फ्रेंडली जीवनशैली आत्मसात करण्यात अपुरे पडले आहोत हे वास्तव स्वीकारावेच लागेल..
या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील अपयशाबद्दल कुणालाही जबाबदार न ठरवता, तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी आम्हाला कोरोना फ्रेंडली जीवनशैली स्वीकारावी लागेल हे निश्चित. आमच्या देशात आम्ही देवीसारख्या महाभयानक रोगाला पळवले, पोलिओलाही आम्ही हद्दपार केले याला कारण एकच होते आम्ही प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला आता कोरोनाच्याबाबतही आम्हाला तेच करावे लागणार आहे. आम्हाला तिसरी लाट येण्यापूर्वीच व्यापक प्रमाणात लसीकरण पूर्ण करावे लागणार आहे. त्याशिवाय आयुर्वेद, होमियोपॅथी अश्या इतर उपचार पद्धतींनी सुचवलेल्या प्रतिबंधक उपाययोजना व्यापक प्रमाणात कराव्या लागणार आहेत. त्याशिवाय मास्क वापरणे, गर्दी टाळणे, स्वच्छता पाळणे अश्या उपाययोजनाही कराव्या लागणार आहेत. एकूणच कोरोना फ्रेंडली जीवनशैली आम्हाला आत्मसात करावी लागणार आहे, तरच आम्ही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जायला सक्षम राहू.

अविनाश पाठक

Leave a Reply