चंदीगढ : १६ मे – देशभरात मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचा संघर्ष सुरूच आहे. हरियाणात शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याविरोधात आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये अनेक शेतकरी जखमी झालेत .
मुख्यमंत्री खट्टर हिसारमध्ये एका कोरोना रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी शेतकरीही या ठिकाणी मोठ्या संख्येने जमा झाले आणि त्यांनी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आंदोलन केलं . पोलिसांनी बॅरिकेटिंग करत शेतकऱ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकऱ्यांच्या आक्रमकपणासमोर याचा काहीही उपयोग झाला नाही. यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. तसेच अश्रुधुराचाही वापर करण्यात आला.
कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम
पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशसह देशभरातील शेतकरी सातत्याने केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. सरकारने तात्काळ कृषी कायदे रद्द करावेत या मागणीवर शेतकरी ठाम असल्याचं दिसतंय. मागील अनेक महिन्यांपासून याच मागणीसाठी शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून आहेत. या काळात सरकारसोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, मात्र जोपर्यंत सरकार कायदे रद्द करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार यावर शेतकरी ठाम आहेत.
मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर हिसारमध्ये पोहचल्यानंतर शेतकरीही तेथे पोहचले. यावेळी शेतकऱ्यांनी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी करत आंदोलन सुरु केलं. याआधी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत पानीपतमध्ये गेले होते. तेथेही त्यांनी गुरु तेग बहादुर संजीवनी रुग्णालयाचं उद्घाटन केलं. त्या ठिकाणी 500 बेड्सची व्यवस्था करण्यात आलीय. तसेच थेट पाईपलाईनद्वारे ऑक्सिजन पुरवठा होणार असल्याचं सांगण्यात आलंय.