अमरावती : १६ मे – मेळघाटातील झिंगापूर गावातील शेतमजूर शिवलाल चिलात्रे हा तेंदूपाने तोडण्यासाठी जवळच्या जंगलात गेला असता त्याच्यावर एका धिप्पाड अस्वलीने अचानक हल्ला केला.
जिवाची पर्वा न करता शिवलाल याने वेळ न दवडता उलट अस्वलीवर हल्ला केल्याने अस्वल जंगलाकडे पळून गेला. या झुंजीत शिवलाल मात्र गंभीर जखमी झाल्याने जवळच्या अंजनगाव येथील दवाखान्यात भरती करण्यात आले. शिवलाल तेंदूपाने तोडण्यासाठी जंगलात गेलेला होता.
अस्वलीने हल्ला करुन त्याची मान तथा हाताच्या पंजावर दुखापत केली. पण, शिवलालने जोराजोरात ओरडून मुकाबला केल्याने अस्वल जंगलात पळून गेले. पोलिस पाटील सुधाकर चिलात्रे यांनी तात्काळ अंजनगावच्या दवाखान्यात जखमीला भरती केले. प्राथमिक उपचारानंतर शिवलाल आता धोक्याबाहेर आहे. वनविभागाकडून शिवलालला नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.