भलेमोठे झाड कोसळल्याने नेत्रावती एक्सप्रेस थांबली

मडगाव : १६ मे – मागील काही दिवसांपासून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. आता या कमी दाबाच्या पट्ट्याचं रुपांतर भयानक चक्रीवादळात होतं आहे. याचा फटका गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीला बसत आहे. काल कोकणासह राज्यात अनेक ठिकाणी पावसानं कहर केला आहे. तर बऱ्याच ठिकाणी झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. अरबी समुद्रातील वादळामुळे किनारपट्टीवर येणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यानं कोकणातील एका रेल्वेवर झाड कोसळलं आहे. त्यामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली आहे.
आज सकाळी नेत्रावती एक्सप्रेस ट्रेन मडगाववरून थिवीमकडे जात असताना या ट्रेनला अपघात झाला आहे. एक भलं मोठं झाड ट्रेनवर कोसळल्यानं मध्येच ही ट्रेन थांबवावी लागली आहे. या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. सध्या लोहमार्गावर पडलेल्या या झाडाला हटवण्याच काम युद्धपातळीवर सुरू असून रेल्वेसेवा लवकरच सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती कोकण रेल्वेतील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
लोहमार्गावर झाड कोसळल्यानं कोकण रेल्वेविभागातील थिवीम ते मडगाव दरम्यान रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम या मार्गावर प्रवास करणाऱ्या इतरही रेल्वेवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील काही ट्रेन उशीरा धावू शकतात. सध्या कोकणातील वातावरण झपाट्यानं बदलत आहे. परिणामी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. तसेच अरबी समुद्रात सुरू असलेल्या चक्रीवादळामुळे राज्यात गारवा निर्माण झाला आहे.

Leave a Reply