पालकमंत्र्यांकडून गायरोड्राईव्ह मशिनरीज कंपनीच्या उपक्रमाचे कौतुक

नागपूर : १६ मे – कमी किंमतीत उपलब्ध असलेले दोन पोर्टेबल व्हेंटीलेटर आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या सुपूर्द करण्यात आले. कोरोनाच्या काळात गायरोड्राईव्ह मशिनरीज प्रायव्हेट लिमीटेड कंपनीने नागपुरातील रुग्णांसाठी व्हेंटीलेटर नि:शुल्क उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. राऊत यांनी कंपनीच्या संचालकांचे आभार मानले.
मूळ यवतमाळ येथील असलेल्या आकाश गड्डमवार व त्यांच्या साथीदारांनी अत्यंत कमी किंमत पोर्टेबल व्हेंटीलेटर तयार केले आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आकाश गड्डमवार यांनी दोन व्हेंटीलेटर भेट दिले. यापैकी एक व्हेंटीलेटर नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पीटल व दुसरे इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय हॉस्पीटलमध्ये रुग्णांच्या सेवेत राहणार आहेत. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे दोन्ही महाविद्यालयांचे अधिष्ठाता उपस्थित होते.
हे व्हेंटीलेटर वजनाने कमी असल्याने कुठेही हलविता येतात. याला आरसी डिव्हाईसही म्हटले जाते. या व्हेंटीलेटरचे वजन केवळ ६ ते ७ किलो आहे. त्यामुळे कुठेही हलविण्यात रुग्णांवर उपचार करणाºयांना अडचण येत नाही. ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी शहरात हलविण्याच्या काळात रुग्णवाहिकेमध्ये सुद्धा हे पोर्टेबल व्हेंटीलेटर ठेवता येते. त्यामुळे रुग्णांना जीवनदान मिळू शकते. तसेच सायकलवर किंवा चारचाकी गाडीमध्ये सुद्धा या व्हेंटीलेटरचा उपयोग केला जाऊ शकतो.
या व्हेंटीलेटर वातावरणातील २१ टक्के प्राणवायू यातून पुरवठा केला जाऊ शकतो. जर एखाद्या रुग्णाला अधिक प्राणवायू लागत असेल तर या व्हेंटीलेटरला अतिरिक्त आॅक्सीजन सिलेंडर सुद्धा जोडता येते. हे व्हेंटीलेटर बॅटरीच्या सहाय्याने सुरू राहते. त्यामुळे ग्रामीण भागात एखादेवेळी वीज नसली तरी सुद्धा बॅटरीच्या सहाय्याने व्हेंटीलेटर सुरू राहू शकते. यातून जवळपास ९५ टक्के शुद्ध आॅक्सीजन रुग्णांना मिळू शकतो.
ग्रामीण व दुर्गम भागासाठी उपयुक्त
पोर्टेबल व्हेंटीलेटर असल्याने ग्रामीण भागातून रुग्ण शहरातील रुग्णालयात आणताना रुग्णांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी हे व्हेंटीलेटर वरदान ठरणारे आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आकाश गड्डमवार यांनी सांगितले.

Leave a Reply