पणजी : १६ मे – अरबी समुद्रात तयार झालेलं चक्रीवादळाने गोव्याच्या दारावर थाप दिली आहे. गोव्यासह पणजीच्या किनारपट्टी भागात चक्रीवादळ दाखल झालं असून, वादळाचा मोठा तडाखा बसला आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने मोठंमोठी झाडं रस्त्यावर मूळासकट उखडून फेकली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. अनेक ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या असून, मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान, चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून कर्नाटकात चौघांचा मृत्यू झाला आहे.
दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेलं चक्रीवादळ तौते गुजरातच्या दिशेनं मार्गक्रमण असून, चक्रीवादळाने गोव्यात धडक मारली आहे. गोव्याच्या किनारपट्टीवर प्रचंड वेगानं हे वादळ धडकलं आहे. दुपारपर्यंत चक्रीवादळाचं केंद्र उत्तर, उत्तर पश्चिम गोवा केंद्र असेल, असं अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता. त्यानंतर चक्रीवादळाने गोव्याच्या किनारपट्टीवर पाऊल ठेवलं. चक्रीवादळामुळे गोव्यात मुसळधार पाऊस झाला. त्याचबरोबर वेगवान वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. गोव्यातील अनेक मार्गांवर मोठंमोठी झाडं उन्मळून पडली असून, अनेक ठिकाणी झाडं पडल्यानं घरांच्या भिंती कोसळल्या आहेत. काही ठिकाणी वाहनांवरही झाडं कोसळी आहेत असल्यानं वाहनांचं नुकसान झालं आहे.
चक्रीवादळाचा गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला फटका बसला आहे. या रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहेत. ३३ केव्ही विद्युत वाहक तारांवर झाडं कोसळल्यानं रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या, मात्र, जनरेटरच्या मदतीने वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला. सध्या रुग्णांना ऑक्सिजन लागत असून, विनाअडथळा ऑक्सिजन पुरवण्याची गरज निर्माण झाली आहे.
कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीप्रमाणे तौते चक्रीवादळामुळे चार मृत्यू झाला आहे. चार नागरिकांना प्राण गमवावे लागले असून, ७३ गावांमध्ये चक्रीवादळामुळे नुकसान झालं आहे. चक्रीवादळामुळे कर्नाटकातील सहा जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. यात किनारपट्टी भागातील तीन, तर इतर जिल्ह्यांचा समावेश आहे. दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन आढावा घेतला.