जिल्हाधिकारी होण्यापूर्वीच प्रांजलला मृत्यूने गाठले

अकोला : १६ मे – देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट आल्यापासून राज्यात मृतांचं प्रमाणही वाढलं आहे. गेल्या काही काळात अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या माणसांना गमावलं आहे. जीवलगांचा झालेला मृत्यू अजूनही अनेकांना पचवता येत नाही. अशात अकोल्यातून एका कुटुंबाचं सर्वस्व हिरावून नेणारी बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षी यूपीएससी उत्तीर्ण झालेल्या एका विद्यार्थ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनानं एका क्षणात जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न हिरावून नेलं आहे. काही दिवसांतच आपला मुलगा लाल दिव्याच्या गाडीत येणार, अशी स्पप्न रंगवणाऱ्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
संबंधित २५ वर्षीय मृत तरुणाचं नाव प्रांजल नाकट असून तो अकोल्यातील तांदळी या छोट्याशा गावचा रहिवासी आहे. त्यानं गेल्यावर्षी यूपीएससी परिक्षा उत्तीर्ण केली होती. ‘यूपीएससी’सारखी परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे त्याच्या आई-वडिलांना आनंदाचा पारावर उरला नव्हता. गावातलं पोरगं जिल्हाधिकारी होणार यामुळे तांदळी गावातील लोकंही भलतेचं खूश होते. या कोरोनानं घात करून अनेकांच्या आनंदाला सुरुंग लावला आहे. काल पहाटे प्रांजलचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या चटका लावून जाणाऱ्या बातमीनं गावातील अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत.
२५ वर्षीय प्रांजल नाकटला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. यामुळे त्याला उपचारासाठी अकोल्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. याठिकाणी उपचार घेत असताना कोरोना विषाणू त्याच्या फुफ्फुसाला लक्ष्य करत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढत होती. पण प्रांजलची फुफ्फुसं निकामी होतं असल्याचं पाहून प्रांजलच्या कुटुंबीयांनी त्याला पुढील उपचारासाठी हैदराबाद याठिकाणी नेण्याचा निर्णय घेतला.
वृत्तानुसार, 6 मे रोजी प्रांजलला अकोल्यावरून एअर अँब्युलन्सनं हैदराबादमधील ‘यशोदा हॉस्पिटल’मध्ये हलवण्यात आलं. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत मोठी सुधारणा होताना दिसत होती. यामुळे कुटुंबीयही खूश होते. मात्र, काल पहाटे प्रांजलच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. ऑक्सिजन पातळी कमालीची घटल्यानं त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रांजलनं 2019 मध्ये यूपीएससी परिक्षा उत्तीर्ण केल्यानंतरही, त्याच्या सारख्या अनेकांना पोस्टींग देण्यात आलं नव्हतं. यूपीएससी परिक्षा उत्तीर्ण होऊन दोन वर्ष झाल्यानंतरही त्याला पोस्टींग न दिल्यानं त्याचं जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न हवेतचं विरलं आहे.

Leave a Reply