अमरावती : १६ मे – अलीकडेच पार पडलेल्या अमेरिकेच्या निवडणूकीत अनेक भारतीयांनी बाजी मारत अमेरिकेच्या संसदेत आपलं पाऊलं ठेवलं होतं. ही घटना ताजी असताना भारतीयांच्या अभिमानात भर घालणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. यावेळी अमरावतीच्या एका पोरानं थेट स्कॉटलंडमधील खासदारकीची निवडणूक जिंकून दाखवली आहे. त्यांनी नुकतीचं खासदारकी पदाची शपत घेत स्कॉटिश संसदेत प्रवेश केला आहे.
स्कॉटलंडमध्ये निवडून आलेल्या अमरावतीच्या युवकाचं नाव डॉ. संदेश प्रकाश गुल्हाणे असून ते सध्या स्कॉटलंडमध्ये वैद्यकीय सेवा बजावत आहेत. विशेष म्हणजे स्कॉटिश संसदेत निवडून जाणारे ते भारतीय वंशाचे पहिलेच खासदार आहेत. डॉ. संदेश यांच्या यशानं अमरावतीसह राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचं प्रचंड कौतुक केलं जात आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या संदेश यांनी केवळ जिद्दीच्या जोरावर एवढ्या मोठ्या यशाला गवसणी घातली आहे. त्यामुळे ते अनेकांच्या कौतुकास पात्र ठरत आहेत.
अमरावती शहरातील भाजी बाजार परिसरातील रहिवासी असणाऱ्या प्रकाश आणि पुष्पा गुल्हाणे यांनी काही वर्षांपूर्वी लंडनला स्थलांतर केलं होतं. संदेश गुल्हाणे हा या त्यांचा एकुलता एक मुलगा असून त्याचा जन्म लंडनमध्येच झाला. व्यावसायानं डॉक्टर असलेल्या संदेश गुल्हाणे यांनी पूर्व किल्ब्राईडमधील रुग्णालयात ऑर्थोपेडिक रजिस्ट्रार म्हणून देखील काम केलं आहे.
वैद्यकीय सेवेत काम करणाऱ्या डॉ. संदेश गुल्हाणे यांना विविध सामाजिक कामांची देखील आवड होती. त्यामुळे त्यांनी स्कॉटिश राजकारणात प्रवेश केला. अलीकडेच पार पडलेल्या स्कॉटिश संसदीय निवडणुकीत डॉ. संदेश यांनी स्कॉटिश कन्झर्व्हेटिव्ह आणि युनियनवादी पार्टीकडून उमेदवारी लढवली होती. त्यांनी ग्लासगो पोलॉक मतदारसंघातून विजयी होऊन स्कॉटिश संसदेत निवडून येणाऱ्या पहिल्या भारतीय वंशाच्या व्यक्तीचा मान मिळवला आहे.