पश्चिम बंगालच्या कुचबिहार जिल्ह्यात राज्यपालांच्या वाहनावरच गुंडांनी हल्ला करून वाहन रोखल्याचा प्रकार झाल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यात पश्चिम बंगालचे राज्यपाल माध्यमांना आपली संतप्त प्रतिक्रिया देत असताना दाखवले असून पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णतः ढासळली असल्याची टीका करतांना ते दिसत आहेत.
राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. देशात राष्ट्रपतींचे पद आहे त्याखालोखाल राज्यात राज्यपालांचे पद आहे त्यामुळे राज्यपालांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली जात असते राज्यपाल जर एखाद्या भागात पाहणी दौरा करण्यासाठी किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी जात असतील तर त्यांच्या सोबत पोलिसांचा मोठा ताफा जात असतो त्याशिवाय ज्या रस्त्याने ते जातात त्या रस्त्यावर देखील आवश्यक तो पोलीस बंदोबस्त ठेवला जातो तरीही काही गुंड येऊन जर राज्यपालांचे वाहन रोखत असतील तर हे राज्याच्या पोलीस यंत्रणेचे अपयश तरी म्हणावे लागेल किंवा मग राज्यसरकारला राज्यपालांना पुरेशी सुरक्षा देण्यात रस नाही असाही निष्कर्ष यातून काढता येईल.
राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी राज्यपाल हे राष्ट्रपतींनी म्हणजेच पर्यायाने केंद्र सरकारने नेमलेले असतात अनेकदा केंद्रात आणि राज्यात परस्परविरोधी विचारधारांची सरकारे असतात. अश्या वेळी तांत्रिक मुद्द्यावरून अनेकदा राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात संघर्षाचे प्रसंग येतात. महाराष्ट्रातही सध्या असे संघर्ष वारंवार सुरूच आहेत. असे असले तरी राज्यपालांवर जीवघेणा हल्ला व्हावा आणि सरकारने बघ्याची भूमिका घ्यावी ही बाब न रुचणारी आहे.
राजकारणात वैचारिक मतभेद असणे हे साहजिक आहे मात्र त्यासाठी एखाद्याच्या जीवावर उठणे हे चुकीचेच आहे. विरोध हा विचारांनी करायचा असतो हिंसेने नव्हे, मात्र पश्चिम बंगालमध्ये होणारा विरोध हा हिंसेच्या वाटेने निघालेला तर नाही ना? अशी शंका घेता येते. विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्त असताना असा हल्ला होणे हे राज्यातील सरकारचे अपयश म्हणावे लागेल किंवा मग सरकारनेच तर हा हल्ला घडवून आणला नाही ना? अशी शंकाही घेता येईल.
महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी राज्यपालांना शासकीय विमान नाकारण्याचा प्रकार घडला होता हा प्रकारही परस्परांवर कुरघोडी करण्याच्या विचारातूनच झाला असल्याचे बोलले जात आहे. राज्यपाल हे पद घटनात्मक दर्जा असणारे पद आहे अश्या वेळी राजकीय विरोधक असले तरी त्या पदाची प्रतिष्ठा राखली जाणे आवश्यक असते ती प्रतिष्ठा हेतुपुरस्सर राखली जात नसेल तर असे प्रकार निकोप लोकशाहीच्या गळ्याला नख लावणारे ठरू शकतात याची जाणीव सर्वच संबंधितांनी ठेवायला हवी. आपल्या देशात लोकशाहीचे रक्षण करायचे असेल तर विरोध हा वैचारिक स्तरावरच करावा लागेल मुद्द्यांवरून गुद्द्यावर येणे हे लोकशाहीला घातकच ठरणार आहे.
अविनाश पाठक