शेतजमिनीवर जबरीने कब्जा केल्याप्रकरणी रणजित सफेलकर आणि टोळीविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर : १५ मे – दुसऱ्याच्या शेतजमिनीवर जबरीने कब्जा करून त्या शेतात प्लॉट पाडून विक्री केल्याप्रकरणी नवीन कामठी पोलिसांनी कामठी येथील कुख्यात गुंड रणजीत सफेलकर व त्याच्या टोळीविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. रणजीत हलके सफेलकर (५२) कामठी, संजय आनंदराव धापोडकर (४३) नागपूर, गुड्डू उर्फ भास्कर पांडुरंग धापोडकर (३९), राकेश हरीशंकर गुप्ता (४३) कामठी, निलेश हेमंत ठाकरे आणि कालू नारायण हाटे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
15 जून 2008 ते 14 मे 2021 दरम्यान ही घटना घडली. आजनी (बु) ता. कामठी येथील रवींद्र उर्फ रवि नत्थुजी घोडे (50) यांचे 6 हेक्टर शेतजमीन आजनी-घोरपड मार्गावर आहे. रणजीत व त्याच्या साथीदारांनी घोडे व त्यांच्या मुलाला जिवे मारण्याची धमकी देत त्यांची शेतजमीन जबरीने बळकावली. त्यासंदर्भात कोणतेही विक्रीपत्र किंवा करारनामा केला नाही. शेतजमीन हडप केल्यानंतर रणजीतने त्यावर प्लॉट पाडून त्या प्लॉटची इतरांना विक्री केली आणि आजच्या बाजारभावाप्रमाणे घोडे यांची 91 लाख रुपयांनी फसवणूक केली. घोडे यांनी पोलिसात तक्रार करण्याची धमकी देताच रणजीतच्या साथीदारांनी घोडे यांचा मुलगा शुभम याचे अपहरण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती. रणजीतच्या दहशतीपोटी घोडे यांना गप्प रहावे लागले. काही दिवसांपूर्वी शहर गुन्हे शाखा पोलिसांनी ऑर्किटेक्ट एकनाथ निमगडे खूनप्रकरणात रणजीत व त्याच्या साथीदारांना अटक केली. त्याचप्रमाणे रणजीतवर आणखी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे घोडे यांची हिंमत वाढली आणि त्यांनी शुक्रवारी शहर गुन्हे शाखा पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीवरून नवीन कामठी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे.

Leave a Reply