वृद्धेचा गळा चिरून अज्ञात आरोपींनी केला खून

नागपूर : १५ मे – एमआयडीसी हद्दीत सत्पकनगर येथे राहणार्या एका वृद्धेचा गळा चिरून अज्ञात आरोपींनी खून केल्याची घटना उघडकीस आली. प्रथमदर्शनी चोरीच्या उद्देशातून ही घटना घडल्याचे दिसून येत आहे. विजयाताई पांडुरंग तिवलकर (६२) असे या वृद्धेचे नाव आहे.
विजयाताईचे पती पांडुरंग हे राज्य राखीव पोलिस बलात कार्यरत होते. नोकरीवर असताना त्यांचा मृत्यू झाल्याने अनुकंपावर तेथेच विजयाताईला कुकची नोकरी मिळाली. चार वर्षांपूर्वी त्या निवृत्त झाल्या होत्या. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली असून त्यांची लग्न झाली आहेत. मुलगा राज्य राखीव पोलिस बलात कार्यरत आहे. मुली पाचपावली हद्दीत राहतात. सुनेसोबत पटत नसल्याने त्या ऐकट्याच सत्पकनगरमध्ये राहत होत्या. गुरूवारी दुपारी त्या कुठेतरी बाहेर गेल्या होत्या. रात्रीला त्या घरी आल्या. रात्री 9 च्या सुमारास मेनगेटला कुलूप लावून त्या झोपी गेल्या.
रात्रीच्या वेळी अज्ञात चोरांनी गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. विजयाताई यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असावा त्यामुळे आरोपींनी त्यांच्या गळा चिरला. शुक्रवारी सकाळी 11 च्या सुमारास विजयाताई यांच्याकडे घरकामाला असलेली मोलकरीण घरी आली. त्यावेळी गेटचे दार उघडे दिसले. दार देखील लोटलेले होते. मोलकरणीने आत जाऊन पाहणी केली असता विजयाताई या रक्ताच्या थारोळ्यात खाटेवर मृतावस्थेत पडून होत्या. मोलकरणीने शेजार्यांना ही माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमितेशकुमार, अप्पर पोलिस आयुक्त डॉ. दिलीप झळके, पोलिस उपायुक्त विवेक मासाळ, गजानन राजमाने, एमआयडीसचे वपोनि युवराज हांडे, पो. नि. (गुन्हे) दिनेश लबडे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आत जाऊन पाहणी केली असात आलमारी उघडी होती. आलमारीतील कपडे अस्तव्यस्त अवस्थेत पडले होते. त्यावरून चोरीच्या उद्देशातून ही घटना घडली असावी असा पोलिसांना संशय आहे. मात्र, चोरांनी किती ऐवज चोरून नेला हे समजू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Leave a Reply