गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रात माशा मारण्याची स्पर्धा सुरु – केशव उपाध्ये

मुंबई : १५ मे – मराठा आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवल्यानंतर आता केंद्र सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर परखड शब्दांत टीका करत, “सगळं केंद्रानं करायचं आणि राज्यात आम्ही माशा मारायच्या आणि मिळालेलं आरक्षण घालवायचं हे किती दिवस चालणार?” असा सवाल केला होता. यावरून राज्याचे अल्पसंख्याकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसेच प्रवक्ते नवाब मलिक यांनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. आता नवाब मलिकांना भाजपा प्रवक्ते केशव उपाध्येंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“माशा मारण्याचा अर्थ कदाचित नवाब मलिक यांना ठावूक नसावा किंवा कळून वळत नसावा. माशा मारण्याची स्पर्धा तर गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरूच आहे. सत्ताधारी घरात लपून आहेत आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस प्रत्येक जिल्ह्यात प्रवास करता आहेत.” असं केशव उपाध्ये यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.
तसेच, “आता ज्या जिल्ह्याचे आपण पालकमंत्री आहात, तेथे तरी किती वेळा गेलात? १० बालकांचे हत्यारे अजून का मोकळे आहेत? बाकी तुम्ही लोकांचे जीव वाचविण्यासाठी काम करताहात की गेलेले जीवांचे आकडे लपविण्यासाठी हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतो आहेच!” असं देखील उपाध्ये यांनी नवाब मलिक यांना उद्देशून म्हटलं आहे.
तर, “फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे? आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजपा माशा मारणे स्पर्धाही भरवा!”, अशी खोचक टीका नवाब मलिक यांनी फडणवीसांवर केलेली आहे.

Leave a Reply