रशियाची स्फुटनिक लस भारतीय लसींपेक्षा महागडी

हैदराबाद : १४ मे – रशियाच्या स्पुटनिक-५ लसीला देशात वापरासाठी परवानगी मिळाल्यानंतर आता या लसीच्या डोसची किंमत जाहीर करण्यात आली आहे. ९९५.४० रुपये प्रति डोस अशी या लसीची किंमत असणार आहे. हैदराबादमधील फार्मा कंपनी डॉ. रेड्डीज लॅबने रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडासोबत स्पुटनिक-५ लस भारतात तयार करण्यासाठी करार केला आहे.
ही किंमत केवळ आयात केलेल्या लसींना लागू होणार आहे. भारतात या लसीचे उत्पादन सुरू झाल्यानंतर किंमती कमी होणार असल्याचेही कंपनीने यावेळी स्पष्ट केले. सध्या जीएसटी जोडून जेवढी कमी ठेवता आली तेवढी कमी किंमत आम्ही ठेवली आहे, असे रेड्डी लॅब्सने स्पष्ट केले.
स्पुटनिक-५ ही लस करोनावरील लढाईत सहाय्यक ठरणार आहे. स्पुटनिक-५ कोरोना विषाणुच्या लढ्यात 91.6 टक्के कार्यक्षम आहे. कोरिया, ब्राझील आणि चीनसारख्या इतर देशांमध्ये स्पुटनिक व्हीचे उत्पादन यापूर्वीच सुरू झाले आहे. 11 ऑगस्ट रोजी जगातील प्रथम कोविड – 19 लसीची नोंदणी करणारा रशिया हा पहिला देश ठरला. रशियाच्या या लसीचे नाव स्पुटनिक-5 असून ते रशियाच्या पहिल्या उपग्रहाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. भारतात याची चाचणी आणि वितरण करण्याचे हक्क डॉ. रेड्डीज लॅबने घेतले आहेत.
गेल्या सप्टेंबरमध्येच रेड्डी लॅब्सने आरडीआयएफ सोबत या लसीच्या चाचणी आणि वितरणाबाबत करार केला होता. रेड्डीज लॅबने दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांना लसीचे १ लाख ५० हजार डोस मिळाले आहेत. आज या लसीचा पहिला डोस हैदराबादमध्ये देण्यात आला, असे लॅबच्या प्रवक्त्यांनी सांगितले. तसेच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या लसींची दुसरी खेप आज भारतात दाखल होणार आहे.
ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) १२ मे रोजी या रशियन कोरोना लसीच्या वापराला परवानगी दिली होती. देशात केवळ आपत्कालीन मर्यादित परिस्थितीच या लसीचा वापर करण्याची परवानगी असणार आहे. यासोबतच काही अटीही डीसीजीआयने लागू केल्या आहेत. यानंतर देशात वापरली जाणारी ही तिसरी लस ठरली आहे.

Leave a Reply