भाजप नेत्याचा व्हिडीओ होतोय सोशल मीडियावर व्हायरल

नवी दिल्ली : १४ मे – करोना संकटात आतापर्यंत देशात अडीच लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झालाय. याच दरम्यान, भाजप नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओत ‘करोना व्हायरसही एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार आहे’, असं म्हणताना त्रिवेंद्र सिंह रावत दिसत आहेत.
दर्शनी पाहता करोना विषाणूही एक जीव आहे, इतरांप्रमाणे त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. परंतु, आपण मनुष्य स्वत:ला सर्वात बुद्धिमान प्राणी समजतो आणि त्याला संपवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यामुळे तो स्वत:च रुप बदलण्याचा प्रयत्न करत आहे. मनुष्याला सुरक्षित राहण्यासाठी विषाणूला मागे टाकण्याची गरज आहे’ असं वक्तव्य त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केलं.
त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या या व्हिडिओवर सोशल मीडियातून अनेक प्रतिक्रियाही उमटत आहेत. यात माजी मुख्यमंत्र्यांना ट्रोलही केलं जातंय. ‘आपला देश आज जगातील सर्वात कठीण परिस्थितीतून का जात असेल, हे एव्हाना कळलंच असेल’ तसंच ‘या विषाणूच्या जीवाला सेंट्रल विस्टामध्ये आश्रय दिला गेला पाहिजे’, अशा अनेक प्रतिक्रिया सोशल मीडयावर पाहायला मिळत आहेत.

Leave a Reply