धनंजय मुंडे पुन्हा एकदा चर्चेत येणार

मुंबई : १४ मे – बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. करुणा शर्मा प्रकरणात पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे ती त्यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे. करुणा यांनी फेसबुकवर पोस्ट करत त्यांच्या पुस्तकाबाबत घोषणा केली आहे. त्याने फेसबुक पोस्ट करत असं म्हटलं आहे की, ‘#Karunadhananjaymunde माझ्या जीवनावर आधारीत सत्य प्रेम जीवनगाथा लवकर प्रकाशन प्रकाशित होण्याच्या मार्गावर असून त्याचे प्रकाशन लवकर केले जाणार आहे.’ त्यामुळे आता करुणा यांच्या पुस्तकात काय असणार याविषयी चर्चांना उधाण आले आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यावेळी फेसबुकवरून हे आरोप फेटाळून लावत धनंजय मुंडे यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक घटना मांडल्या होत्या. हे प्रकरण आता निवळण्याच्या मार्गावर असताना, करुणा धनंजय मुंडे अर्थात करुणा शर्मा यांनी केलेल्या पोस्टमुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.
करुणा यांची बहिण रेणू शर्मा यांनी केलेले आरोप मागे जरी घेतले असले तरी हे प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांच्या भुवया उंचावणारं ठरलं होतं. त्यामुळे आता या पुस्तकात नेमकं काय असणार, ही चर्चा आहे.
करुणा शर्मा उर्फ करुणा धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपुर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची देखील भेट घेतली होती. त्यावेळी शर्मा यांनी राजकारणात येणार असल्याचे संकेत दिले होते तर आमदारकीची निवडणूक लढवण्याबाबतही इशारा दिला होता.
धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत हे सर्व आरोप फेटाळले होते. शिवाय रेणू शर्मा ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप करत त्यांनी एका महिलेसोबत (रेणू शर्मा यांच्या बहीण करुणा शर्मा) परस्पर सहमतीने संबंध असल्याचेही त्यांन मान्य केले होते. त्यांना दोन मुलं देखील आहेत, त्या मुलांना धनंजय मुंडेंनी स्वत:चं नाव दिल्याचंही यात म्हटलं होतं.

Leave a Reply