ईथर ट्रेंड आशिया संचालकांनी केली ८४ लाख ४३ हजारांची फसवणूक

नागपूर : १४ मे – इथर ट्रेड एशियामध्ये विविध प्रलोभन दाखवून गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास भाग पाडणाऱ्या संचालकांनी आतापर्यंत ८४ लाख ४३ हजाराने फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. निषेध महादेव वासनिक, प्रगती निषेध वासनिक (रा. वसिम पॅलेस, आराधनानगर), राजेंद्र रायभान खोब्रागडे, साक्षी राजेंद्र खोब्रागडे (भाऊरावनगर), संदेश पंजाबराव लांजेवार (गोंडेगाव, पारशिवनी), गजानन भोलेनाथ मुंगणे (चिमूर, चंद्रपूर) आणि श्रीकांत लक्ष्मण झिबाड (साईबाबानगर) अशी आरोपी संचालकांची नावे आहेत.
काही वर्षांपूर्वी या आरोपींनी इथर ट्रेड एशिया नावाची कंपनी सुरू केली होती. कंपनीच्या माध्यमातून त्यांनी मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये इथेरिअम क्रिप्टोकरन्सी’ या नावाने सेमीनार घेऊन गुंतवणूकदारांना विविध प्रलोभने दाखविले. गुंतवणूक केल्यास काही महिन्यातच त्यांना दुप्पट पैसे देण्यात येईल असेही त्यांनी गुंतवणूकदारांना सांगितले. त्यानुसार पंचवटीनगर, बिनाकी मंगळवारी येथील निलेश नरहरी मोहाडीकर (33) यांनी लाखो रुपये या कंपनीत गुंतविले. मोहाडीकर यांच्याप्रमाणे इतरांनी देखील या कंपनीत गुंतवणूक केली होती.
परंतु, मुदत संपल्यानतर आरोपींनी मूळ ठेव आणि त्यावरील व्याज परत न करता कंपनीचे कार्यालय बंद करून पळ काढला. याप्रकरणी मोहाडीकर यांच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. पहिल्या तक्रारीत मोहाडीकर यांनी ४८ लाख ६० हजाराने फसवणूक केल्याचे नमूद केले होते. त्यानंतर आणखी तक्रारदार आल्याने हा आकडा ८४ लाख ४३ हजारावर गेला. ज्या आणखी गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असेल त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा कार्यालय, चौथा मजला, सिव्हील लाईन्स, नागपूर येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.

Leave a Reply