नागपूर : १३ मे – कोरोना रुग्णाच्या नातेवाईंकानी रुग्णालयातील बिलांचा घोळ पुढे आणल्यामुळे रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णाला लावण्यात आलेले व्हेंटिलेटर काढल्याने रुग्णांचा मृत्यू झाला, असा खळबळजनक आरोप रुग्णाच्या मुलाने केला आहे. हा संपूर्ण प्रकार नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील क्रिस्टल हॉस्पिटलमध्ये घडला आहे. या संदर्भात माजी महापौर संदीप जोशी यांच्या नेतृत्वात पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
२१ एप्रिल रोजी दिलीप कडेकर नामक कोरोनाबाधित रुग्णाला क्रिस्टल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णाला दाखल करताना रुग्णालय प्रशासनाने दोन लाख रुपयांच्या पॅकेजमध्ये रुग्ण डिस्चार्ज होईपर्यंत सर्व सोय उपलब्ध केली जाईल, असे आश्वासन दिले असल्याची माहिती मृत रुग्णाचा मुलगा प्रणित याने दिली. त्यानुसार प्रणितने उपचारादरम्यान २ लाख रुपये रुग्णालयात जमा केले. त्यानंतर सुद्धा रुग्णालयाने अव्वाच्या सव्वा दराने औषध, टेस्ट आणि उपचाराचे बिल आकारल्याने प्रणित याने माजी महापौर संदीप जोशी यांच्याकडे या संदर्भात तक्रार दाखल केली होती.
संदीप जोशी यांनी देखील तक्रार मिळाल्यानंतर रुग्णालयात जाऊन बिलांची तपासणी केली असता त्यांना त्यामध्ये प्रचंड घोटाळा आढळून आला, तेव्हा जोशी यांनी बिलांचे ऑडिट करण्याची मागणी रुग्णालय प्रशासनाकडे केली असता रुग्णालय प्रशासनाने ऑडिट करिता काही वेळ मागून घेतला होता. दरम्यानच्या काळात प्रणितने त्याच्या वडिलांची भेट घेतली होती, ते व्यवस्थित बोलत होते, मात्र त्याच्या काही वेळातच रुग्णालय प्रशासनाने प्रणितला फोन करून तुझ्या वडिलांचा मृत्यू झाल्याची माहिती कळवली. रुग्णालयामधील बिलांचा घोळ बाहेर काढल्यामुळेच रुग्णालय प्रशासनाने वडिलांचे व्हेंटिलेटर काढून त्यांचा जीव घेतल्याचा आरोप प्रणित कडेकरने केला.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध प्रचंड संताप निर्माण झालेला आहे. संतापलेल्या नागरिकांनी माजी महापौर संदीप जोशी यांच्या नेतृत्वाखाली पाचपावली पोलीस ठाण्यात क्रिस्टल हॉस्पिटलच्या विरोधात तक्रार दाखल केली असून त्यामध्ये हॉस्पिटलवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.