माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना तात्पुरता दिलासा

मुंबई : १३ मे – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीखोरीचे आरोप केल्यानंतर चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना गुरुवारी तात्पुरता दिलासा मिळाला. राज्य सरकारने आम्ही २० मेपर्यंत परमबीर सिंग यांना अटक करणार नाही, अशी हमी उच्च न्यायालयात दिली. सरकारी वकील दरायस खंबाटा यांनी यासंदर्भातील माहिती दिली.
आता याप्रकरणाची पुढील सुनावणी 20 मे रोजी होणार आहे. त्यामुळे आता तोपर्यंत परमबीर सिंग यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. परमबीर सिंग यांच्याविरोधात अॅट्रोसिटी प्रिव्हेन्शन अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालायत याचिका दाखल केली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. एसीबी म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तीन प्रकरणांची गोपनीय चौकशी (डिस्क्रीट इन्कवायरी) सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक बी आर घाडगे, पोलीस निरीक्षक अनुप डांगे आणि बुकी सोनू जालान यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर ही चौकशी सुरु असल्याची माहिती आहे.
ही प्राथमिक स्वरूपाची चौकशी असते जी तीन महिन्यांच्या कालावधीत पार पडते. त्यानंतर जे पुरावे प्राथमिक चौकशीत मिळतात त्यानुसार खुली चौकशी किंवा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया ठरते. सध्या तरी या तीनही प्रकरणामध्ये गोपनीय चौकशीला सुरुवात झाली असून लवकरच संबंधित तक्रारदारांना जबाबासाठी समन्स पाठवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply