तिसरी लाट थोपवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करा – उच्च न्यायालयाचे आदेश

नागपूर : १३ मे – नागपूर शहरात कोरोनाचा विस्फोट झालाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत यंत्रणा कमी पडली व यात कोरोनामुळे अनेकांचे जीव गेलेत.यापुढे याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कोरोनाच्या येणार्या तिसऱ्या लाटेला थोपवून धरा. तसेच विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनामध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिले. ग्रामीण भागामध्ये याची पूर्वतयारी करण्यासाठी ग्रामपंचायतींनी विभागीय आयुक्तांचा सल्ला घ्यावा, असेही न्यायालयाने निर्देश दिले आहे.
रुग्ण संख्या जास्त आणि उपाययोजना व साधनसामुग्री कमी यामुळे कोरोना संक्रमण काळात शहरात हाहाकार माजला.अनेकांना खाटा, औषधी, ऑक्सीजन वेळेत उपलब्ध न झाल्याने रुग्णांची गैरसोय झाली. अनेकांना प्राणास मुकावे लागले. याची दखल घेत नागपूर खंडपीठाने जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. कोरोनाची दुसरी लाट निवळत नाही तो तिसरी लाट येणार अशी दाट शक्यता वर्तविल्या जात आहे. कोरोनाच्या तिसर्या लाटेमध्ये २ ते १८ वर्षे वयोगट आणि १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांना धोका असल्याने मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. त्या अनुषंगाने नवजात अर्भक काळजी कक्ष, जंबो कोविड रुग्णालय, तात्पुरत्या खाटांची व्यवस्था करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. या करिता नागपूर शहरातील सहारा सिटी, कस्तुरचंद पार्क, मानकापूर क्रीडा संकुल, मेडिकल, मेयो, एम्स या ठिकाणांचा वापर करण्याचा विचार करावा. अकोला व यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालय, भंडारा व वर्धा येथील सामान्य रुग्णालयात आवश्यक सोयींची तयारी ठेवावी, असेही नमूद केले. नागपूर महापालिकेच्या अंतर्गत येणार्या ४९ रुग्णालयांना अद्याप परवानगी मिळाली नसल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. न्यायलयीन मित्र अँड. श्रीरंग भांडारकर, राज्य सरकारतर्फे मुख्य सरकारी वकील केतकी जोशी, मध्यस्थी अर्जदारांतर्फे अँड. एम. अनिलकुमार, आयएमएतर्फे अँड. बी. जी. कुलकर्णी यांनी, अँड. तुषार मंडलेकर यांनी कामकाज पाहिले.

Leave a Reply