घ्या समजून राजेहो – लोकनेता नितीन गडकरी

सध्या देशात कोरोनाने जसा  कहर केला आहे तसाच राजकारणानेही कहर केला आहे. फक्त देशातच नव्हे तर समस्त मानव जातीवर संकट आले असताना त्या घटनाक्रमात राजकारण करणे चुकीचे आहे असे सर्वच राजकीय पक्ष आणि राजकीय नेते परस्परांना म्हणत असतात, मात्र लोका  सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण या न्यायाने प्रत्येक जण छोट्यात  छोट्या घटनेचे राजकारण करून विरोधकांवर टीका करण्यातच धन्यता मानताना दिसून येत आहेत. अश्या वेळी मायबाप जनतेच्या समस्येचे  काय होते याचा कोणीही विचार करीत नाही जनता ही वाऱ्यावरच  सोडली जाते. अश्या वेळी  जर एखादा राजकारणी  राजकारण न करता फक्त जनतेचा विचार करून सोयी सुविधा कश्या उपलब्ध करून देता येतील  यासाठी  प्रयत्न करताना दिसला, आणि जनतेला त्या सेवा मिळत असल्या, तर जनसामान्य निश्चितच सुखावतात.  अश्या वेळी तो नेता  फक्त राजकीय नेता उरत नाही तर लोकनेता म्हणून जनसामान्यांच्या हृदयात स्थान मिळवून जातो.

जनसामान्यांच्या हृदयात अश्याच  प्रकारे   लोकसेवा करून स्थान मिळवणाऱ्या नेत्यांमध्ये मुळचे नागपूरकर असलेले राष्ट्रीय स्तरावरील  नेते नितीन जयराम गडकरी यांचे नाव घ्यावे लागेल.  विशेषतः कोरोनाची दुसरी लाट आली असताना नागपूर  हे हॉटस्पॉट म्हणून ओळखले जाऊ लागले होते, त्यावेळी सर्वच राजकीय नेते परस्परांवर टीका करण्यात आणि प्रसंगी  अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात धन्यता मनात होते, अश्यावेळी नितीन गडकरी नागपूरकरांना वाचवता कसे येईल याची चिंता करत होते  फक्त चिंता करणे इतकेच काम केले नाही तर नितीनजींनी प्रत्यक्ष कृतीलाही सुरुवात केली.  या कामात त्यांनी सर्वच पक्षांच्या नेत्यांना सोबत घेतले, प्रसंगी स्वपक्षीयांना कानपिचक्याही दिल्या, अधिकाऱ्यांना सोबत घेतले आणि  नागपूरच्या समस्या जमतील तितक्या मार्गी लावल्या.  त्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला अनेकांचे जीवही वाचले गडकरींच्या  या सर्व धडपडीचे देशभर कौतुक झाले.  भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी तर कोरोनाचे  पूर्ण आपत्ती व्यवस्थापन कार्य गडकरींच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात राबवले जावे अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली. 

नितीन जयराम गडकरी हे भारतीय राजकारणातले एक वेगळेच रसायन म्हणून ओळखले जाते, हा माणूस भाजपचा  राष्ट्रीय नेता  म्हणून ओळखला जात असला तरी १० टक्के राजकारण आणि उरलेले ९० टक्के समाजकारण हे तत्व ठेऊनच गडकरींची  आजवरची वाटचाल सुरु राहिली आहे. त्यामुळेच सर्वसामान्य राजकारण्यांबाबत जनसामान्य बोलतांना कधी टीकेचा  तर कधी टिंगलीचा सूर आळवतात, तसे गडकरींच्या बाबत होत नाही गल्लीतल्या माणसापासून तर अमिताभ बच्चन  धीरूभाई अंबानी पर्यंत प्रत्येकाला नितीन गडकरी आपले वाटत आलेले आहेत. 

गडकरींचे खरे कार्यकर्तृत्व जनसामान्यांसमोर आले ते १९९५ नंतर, महाराष्ट्रातील शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री  म्हणून त्यांनी जे काम केले त्याला तोड नव्हती.  राज्यात रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम त्यांनी केले  मुंबई पुणे द्रुतगती मार्गाचे काम त्यांनी ज्या पद्धतीने केले त्याची दस्तुरखुद्द धीरूभाई अंबानींनींहि तारीफ केली होती.

गडकरी विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते असतानाही त्यांनी पक्षभेद बाजूला ठेवत जनहिताला  कसे प्राधान्य देता येईल याचा कायम विचार केला.   महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी व्यथित झालेल्या गडकरींनी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम  कसे करता येईल, यासाठी पूर्ती उद्योग समूहाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले.  तिथेही त्यांनी पक्षभेद बाजूला ठेवले  प्रसंगी शरद पवारांसारख्या कट्टर विरोधकांचीही त्यांनी मदत घेतली.  शेतकऱ्यांच्या शेतातील काडीकचऱ्यापासूनही कसे उत्पन्न घेता येईल, यासाठी त्यांनी  विविध प्रयोग केले त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने लोकनेते ठरले आहेत.

यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव एकदमच झपाटून वाढला.  कोरोनाचा सर्व जोर अमरावती आणि नागपूर या दोन जिल्ह्यात होता,  गडकरी हे नागपूरचे खासदार त्यामुळे त्यांनी सर्वप्रथम नागपुरवर लक्ष केंद्रित केले मार्चमध्ये अचानक रुग्ण वाढल्याने  नागपुरात रुग्णालयात जागाच  मिळत नव्हती त्यावेळी गडकरी पुढे आले, त्यांनी त्यांच्या कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांना  या कामासाठी नेमले.  जनतेला वृत्तपत्रातून आवाहन करण्यात आले, ज्यांना रुग्णालयात रुग्णशय्या   मिळणार नाही  त्यांनी या अधिकाऱ्यांना सांगावे असे कळवण्यात आले, या दरम्यान या अधिकाऱ्यांनी जवळजवळ १५०० रुग्णांना रुग्णशय्या उपलब्ध करून दिल्या.    नागपुरात रुग्णशय्यांची कमी बघता नव्याने उभारल्या गेलेल्या एम्समध्ये त्यांनी ५०० बेड्सची व्यवस्था केली मेयो, मेडिकल येथेही प्रत्येकी १०० बेड्स वाढवण्याची व्यवस्था केली या काळात रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी  ऍम्ब्युलन्सची गरज होती, त्याचीही व्यवस्था गडकरींनी पुढाकार घेऊन केली.

रुग्णांना अब्युलन्सने रुग्णालयात नेऊन सोडले तरी पुढे अनेक अडचणी येतात.  त्या काळात नागपुरात ऑक्सिजनचा तुटवडा होता,  त्याचबरोबर कोरोनाच्या रुग्णांना लागणारे रेमेडिसिवीर हे इंजेक्शनही उपलब्ध नव्हते.  गडकरींनी रेमेडिसिवीर बनवणाऱ्या  कारखानदारांशीच थेट संपर्क केला, त्यांच्याकडून नागपुरात तातडीने पुरेसे रेमेडिसिवीर कसे उपलब्ध होईल याची व्यवस्था केली.   त्यानंतर पाठपुरावा करून वर्धा येथे रेमेडिसिवीर इंजेक्शनची उत्पादन कसे करता येईल  हा त्यांनी प्रयत्न केला आणि तो यशस्वीही झाला.  वर्धेत खासगी उद्योजकाच्या मदतीने  आज दररोज ३० हजार रेमेडिसिवीर  इंजेक्शन्स तयार होत आहेत. त्यामुळे विदर्भाचीच नव्हे तर महाराष्ट्राचाही सोय झाली आहे.

ऑक्सिजनचा तुटवडा बघता गडकरींनी तज्ज्ञांशी चर्चा करून सुरुवातीला बाहेरून ऑक्सिजन तर मागवला, मात्र नंतर नागपुरातील  मोठ्या हॉस्पिटल्स मध्ये स्वतःचेच ऑक्सिजन प्लांट्स कसे उभे करता येतील हे प्रयत्न गडकरींनी केले.  त्यासाठी वेस्टर्न  कोलफिल्ड सारख्या उद्योगांशी बोलून त्यांनी पैसाही उभा केला परिणामी विदर्भात अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन निर्मिती  केली जात आहे. कोरोना काळात कोरोना तपासणीसाठी त्यांनी फिरत्या प्रयोगशाळाही उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचबरोबर  जीनोम सिक्वेन्सिंग ही अत्याधुनिक सुविधाही त्यांनी उपलब्ध करून दिली आहे.  मोठ्या प्रमाणात  व्हेंटीलेटर्स आणि ऑक्सिजन काँसंट्रेटर्स देखील गडकरींच्या प्रयत्नांनी उपलब्ध झालेले आहेत. कोरोना रुग्णांना  प्लाझ्मा उपलब्ध व्हावा यासाठीही गडकरींच्या प्रयत्नांनी सोय झाली आहे. विदर्भासोबत विदभाबाहेरही शक्य त्या सोयी ते उपलब्ध करून देत आहेत  आजच गोव्याला दररोज एक टँकर ऑक्सिजन पाठवला जावा असे निर्देश त्यांनी दिले आहेत. 

याकाळात गडकरींनी नागपुरातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांना विश्वासात घेतले. त्यांच्या नियमित बैठकी घेतल्या, त्यांना जिथे कुठे गरज असेल तिथे वरिष्ठ अधिकारी किंवा मंत्र्यांशी बोलून अडचणी कश्या सोडवता येतील हा प्रयत्न त्यांनी केला. गडकरी भाजपचे आहेत तर राज्यात महाआघाडीचे  सरकार आहे. या सरकारचे सर्व मंत्री हे गडकरींचे विरोधक पण त्यांच्यासोबतही गडकरींनी बैठक घेऊन  विश्वास निर्माण केला. परिणामी सर्वच कामे मार्गी लागण्याची सोय झाली.

यंदाच्या   वर्षात केलेल्या कामांची ही यादी आहे.  गेल्या वर्षीही कोरोना सुरु झाल्यावर त्यांनी पुढाकार घेत वेगवेगळी कामे केली कोरोनाची लाट येताच सर्वप्रथम गरज होती ती सॅनिटायझरची.  सॅनिटायझरचा काळाबाजार होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी  त्यांच्या पूर्ती उद्योग समूहाच्या माध्यमातून सॅनिटायझर बनवण्याचा प्रकल्प उभा केला विदर्भात सॅनिटायझरच्या  २ लाख बॉटल्स पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. २ लाख गरजूंना धान्याच्या किट्स पोहोचवण्याचे कामही त्यांच्या माध्यमातून झाले,  फ्रंटलाईन वर्कर्सना १५०० पीपीई किट्स त्यांनी पुरवल्या. याशिवाय १ लाख मास्कही त्यांनी पुरवले. विशेष म्हणजे  हे सर्व करतांना कोणताही गाजावाजा नव्हता.

कोरोनाच्या काळात गडकरींसोबत इतर भाजप कार्यकर्तेही कामाला लागले होते त्या सर्वांना आधी प्रकृतीची काळजी घे, आणि मगच काम कर  असा दम भरण्याचे कामही गडकरींनी चालूच ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी भाजप पदाधिकारांच्या सभेत  त्यांनी कार्यकर्त्यांना याबाबत कानपिचक्याच दिल्या. काम करत राहा एक ऑक्सिजन सिलिंडर घेऊन दहा जण  फोटो काढत बसू नका  त्यापेक्षा लोकांना सेवा द्या ते तुमचे नाव घेतील असेही त्यांनी ठणकावले. त्यांच्या या भाषणावर उलटसुलट चर्चाही  झाली मात्र आपल्या स्वभावानुसार जे काही बोलले त्यावर गडकरी ठाम होते.

हे सर्व बघता गडकरींनी आपले १० टक्के राजकारण आणि ९० टक्के समाजकारण हे तत्व कायम ठेवले आहे हे स्पष्ट होते त्यामुळेच नितीन  गडकरी हे जरी राजकीय नेते असले तरी  खऱ्या अर्थाने  लोकनेताच आहेत हे सिद्ध होते.

तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो….

ता.क. :  घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या www.facebook.com/BloggerAvinashPathak या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.

अविनाश पाठक

Leave a Reply