मुंबई : १३ मे – उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी सहा कोटी खर्च करण्यावरुन भाजपा आमदार नितेश राणे यांनी संताप व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी शिवसेना भवनातून अनेक सेलिब्रिटींना फोन जात असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. नितेश राणे यांनी दिशा पटानी, करिना कपूर, कतरिना कैफ, फरहान अख्तर यांचा उल्लेख करत त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचाही आरोप केला आहे.
“या सरकारने रिक्षावाल्यांचे १५०० रुपये अजून दिलेले नाहीत. गहू, तांदूळ देणार होते त्याचा एक दानाही मिळालेला नाही. साडेपाच हजारांचं पॅकेज जाहीर केलं होतं त्याचं काहीही झालेलं नाही, एक रुपयाही मिळालेला नाही. दुसरीकडे सहा कोटी खर्च होत आहेत. हे पैसे फक्त उपमुख्यमंत्री खर्च करत नाही आहेत. महाराष्ट्र सरकारने अनेक खासगी एजन्सींना नेमलं आहे. रेन ड्रॉप नावाची एजन्सी आहे, ज्यामार्फत दिशा पटानी, करिना कपूर, कतरिना कैफ, फरहान अख्तर यांना मोठ्या प्रमाणात पैसे दिले जात आहे. काही लोकांना तर शिवसेना भवनमधून फोन केले जात आहेत. याचे पुरावे आमच्याकडे आहेत. छोटे कलाकार असतील तर दोन-तीन लाख आणि मोठे असतील तर १०-१५ लाख इतके पैसे दिले जात आहेत,” असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
“तुम्ही करीना कपूर किंवा कतरिना कैफ तसंच इतर कलाकारांची अलीकडची ट्विटस बघा. सगळ्याचे ट्विट एकसारखे आणि महाराष्ट्र सरकारबद्दल दिसतील. या बॉलिवूड सेलिब्रिटींकडून पैसे देऊन ट्विट करवून घेतले जात आहेत, पैशाचा आकडा इतका मोठा आहे की त्याचा विचारही केला जाऊ शकत नाही,” असंही ते म्हणाले आहेत.
“एका बाजूला लोकांना देण्यासाठी, ऑक्सिजनसाठी पैसे नाहीत. प्रत्येक गोष्टीसाठी केंद्राकडे भीक मागत असतात. दुसऱ्या बाजूला स्वत:ला मेकअप लावण्यासाठी सगळ्या कलाकारांना कामाला लावतात. फोन करुन त्यांच्यावर दबाव आणले जातात. एका बाजूला गरिबी दाखवून दुसऱ्या बाजूला स्वत:वर खर्च करता हा खोटारडेपणा नाही का?,” अशी विचारणा यावेळी त्यांनी केली.
“अधिवेशनात या सरकारला उघडं पाडणार असून हा विषय मांडणार आहे. शिवसेना भवनातून कोणाला फोन गेले याची यादी माझ्याकडे आहे. ही धूळफेक आणि भंपकपणा आहे,” असंही ते म्हणालेत.