सोलापूर : १२ मे – सोलापूर जिल्ह्यात दरोडा टाकल्यानंतर तीन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला पुणे जिल्ह्यात अटक करण्यात आली. मात्र इंदापूर तालुक्यातील सुगावहून सोलापूरला घेऊन जात असताना आरोपीच्या नातेवाईकांनी त्याला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या गाडीला चार ते पाच वेळा धडक देऊन नातवेाईकांनी हल्ला चढवला. या फिल्मी स्टाईल थरार नाट्यानंतर अखेर पोलिसांनी सर्वांवर गुन्हे दाखल केले आहेत
आरोपी अमोल दत्तू सावंत याने सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी गावी तीन महिन्यांपूर्वी दरोडा टाकला होता. मात्र या गुन्ह्यात तो फरार होता. सोलापूर जिल्ह्याचे पोलिस त्याला शोधत इंदापूर येथील सुगाव या ठिकाणी आले. पोलिसांनी तिथून आरोपीला ताब्यात घेतले.
टेंभूर्णीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले यांच्यासह इंदापूरच्या पोलिसांचाही यात समावेश होता. यानंतर आरोपीला पोलिस खासगी वाहनात घेऊन निघाले. शिरसोडी-इंदापूर रस्त्याने जात असताना पोलिसांच्या गाडीचा एसयूव्ही मॉडेलची पांढर्या रंगाची एम एच १२ एएच २५१५ या नंबरची गाडी फिर्यादींच्या गाडीचा पाठलाग करत आली.
माळवाडी नं १ येथील पोलिसांच्या खासगी गाडीला पाठलाग करणाऱ्या गाडीने पाठीमागून जोराची धडक दिली. चार ते पाच वेळा धडक देऊन पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपींच्या नातेवाईकांनी आरोपी अमोल सावंत याला पोलिसांच्या ताब्यातून सिने स्टाईलने पळवून नेण्याचा प्रयत्न केला.
फिल्मी स्टाईल थरार नाट्यात अखेर पोलिसांनी सर्वांवर गुन्हे दाखल केले आहेत. दत्तू नारायण सावंत, रोहन दत्तू सावंत, अमोल दत्तू सावंत, उर्मिला दत्तू सावंत, शर्मिला दत्तू सावंत, सुरेखा दत्तू सावंत अशी आरोपींची नावं असून सर्व सुगावचे रहिवासी आहेत. इंदापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.