मुंबई : १२ मे – जनहिताच्या निर्णयांच्या बाबतीत भाजप नेहमीच राज्यातील सरकारच्या सोबत आहे, पण दुर्दैवानं राज्यातील महाविकास आघाडी सरकार राजकीय हित डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घेते. पंतप्रधान मोदींचा मत्सर आणि केंद्र सरकारची बदनामी याच निकषांवर राज्य सरकारचा कारभार सुरू आहे,’ असा आरोप माजी मंत्री, आमदार अँड. आशिष शेलार यांनी आज केला.
मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील करोना स्थितीवरून त्यांनी ठाकरे सरकावर टीकेची तोफ डागली. ‘राज्यातील फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांचे लसीकरणही अद्याप पूर्ण झालेलं नाही असं आजच समोर आलं आहे. तसंच, ४० टक्के फ्रंटलाइन वर्कर्सना दुसरा डोस उपलब्ध होत नाही. तिसरीकडं ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील नागरिकांना वणवण करावी लागत आहे. तर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसच देऊ शकत नाही असं सरकार सांगत आहे. राज्य सरकारचा नियोजनशून्य कारभार यासाठी जबाबदार आहे, असं शेलार म्हणाले.
‘केंद्र सरकारला बदनाम करण्याच्या प्रयत्नात राज्यातील जनतेचे हाल केले जात आहेत. लस आली तेव्हा राज्यातील एका कॅबिनेट मंत्र्यानं ही मोदी लस असल्याचं विधान करून गैरसमज पसरवले. फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना प्राधान्यानं लस देण्याच्या सूचना केंद्र सरकारनं केल्या होत्या. ते काम आजपर्यंत पूर्ण झालेलं नाही. केंद्रानं ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याच्या सूचना केल्या, तेव्हा राज्य सरकारनं ४५ वयोगटाची मागणी केली. अशा पद्धतीनं प्रत्येक वेळी राजकीय हित साधलं जात आहे, असा आरोप शेलार यांनी केला. ‘आमच्या निवेदनांना उत्तर देऊ नका, आमच्या पत्रांना हवं तर केराची टोपली दाखवा, पण किमान जनतेच्या हिताचे निर्णय तरी घ्या. राजकीय लाभ बाजूला ठेवून जनहिताला प्राधान्य द्या, असं आवाहन शेलार यांनी यावेळी केलं.
‘नाना पटोलेंच्या रुपाने महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला विनोदी कलाकार अध्यक्ष लाभले आहेत. ते अनेक विनोद करीत असतात. त्यांच्या आजपर्यंत झालेल्या प्रत्येक पत्रकार परिषदेचा विषय मोदी, मोदी आणि मोदी हाच आहे. पटोले हे विनोदी कलाकार आहेत. त्यांना गांभीर्यानं घ्यायची गरज नाही,’ असं शेलार म्हणाले.