मुंबई : १२ मे – महाराष्ट्रात पुढील काही दिवस १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण स्थगित करण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंड्ळाने घेतला आहे. आज मुंबईत पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. या दरम्यान ज्या ४५ वर्षे पेक्षा अधिक वय असणाऱ्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे त्यांना प्राथम्य क्रमाने दुसरा डोस दिला जाईल असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. राज्यात १५ मे नंतरही लॉक डाऊन वाढवला जाऊ शकतो असे संकेत त्यांनी दिले.
राजेश टोपेंनी पुढे म्हटलं, लॉकडाऊनमुळे रुग्ण वाढीचं प्रमाण घटलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय मुख्यमंंत्री जाहीर करतील. 45 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करणं महत्वाचं आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण तूर्तास स्थगित करण्यात आलं आहे. दुसरा डोस आधी पूर्ण करावा लागणार आहे. सिरमकडून 20 तारखेनंतर 2 कोटी लस देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. लसींचा पुरवठा होताच 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होईल.
राज्यात रुग्ण वाढीचा दर घसरत आहे. कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे. म्युकरमायसोसिसचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात यावा अशी सर्वांनीच मागणी केली त्यानंतर लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार यापूर्वी ब्रेक द चेन अंतर्गत लागू असलेले कठोर निर्बंध या कालावधीत सुद्धा लागू असणार आहेत.
केंद्र सरकारकडून आवश्यक तो लसींचा पुरवठा न झाल्याने १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरण थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला असे टोपे यांनी यावेळी सांगितले. सिरम इंस्टीट्युटचे अदर पुनावाला यांनी मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या भेटीत २० मे नंतर दरमहा दीड कोटी कोव्हीशील्ड लसी पुरवण्याचे मान्य केले आहे. त्यानंतर १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना लसीकरण करता येईल असे ते म्हणाले.