भंडाऱ्यात एकाचं दिवशी वाघाच्या ३ बछड्यांसह अस्वलाचा मृत्यू

भंडारा : १२ मे – भंडारा जिल्ह्यासाठी बुधवारचा दिवस अत्यंत दुर्दैवी निघाला. आज वाघाच्या तीन बछड्यांचा व एका अस्वलाचा मृत्यू झाला. तीन वेगवेगळ्या ठिकाणी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे वन्यजीव प्रेमी आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. जिल्हा मुख्यालयापासून अंदाजे १५ किमी अंतरावर असलेल्या गराडा/ बूज. (पहेला) गावाजवळून जाणाऱ्या नहराच्या बाजूला असलेल्या सायफन टाकीत (विहिरीत) आज पहाटे वाघाचे दोन बछडे मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस आणि आर्मीची भरतीची तयारी करण्यासाठी दिनचर्येप्रमाणे पहाटे धावण्याचा सराव करण्याकरिता गेलेल्या काही युवकांना वाघाचे दोन बछडे विहिरीत मृतावस्थेत दिसून आले.
याची माहिती वन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच वनक्षेत्र अधिकारी वाजुरकर यांच्यासह वन विभागाची चमू घटनास्थळी पोहचली. त्यांनी विहिरीतून दोन्ही बछड्यांना बाहेर काढले. घटनास्थळी दोन्ही मृत बछड्यांच्या जवळच वाघिणीचे पगमार्क दिसून आल्याने या दोन्ही बछड्यांची आई जवळच असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. उपवनसंरक्षक एस.बी.भलावी, जिल्हा मानद वन्यजीव रक्षक नदीम खान व शाहीद खान घटनास्थळी पोहचले. काल ठसे आढळलेल्या वाघाचा या बछड्याशी काही संबंध आहे का याचा शोध घेणे सुरू झाले आहे.पहाटे 2 बछड्याच्या मृत्यूच्या वार्तेनंतर काही तासातच पवनी वन परिक्षेत्रात ही दुसरी घटना चिंतेचा विषय ठरत आहे.
दुसरीकडे भंडारा वन विभागा अंतर्गत खापा राउंडच्या कक्ष क्रमांक 286 मध्ये एका नर अस्वलाचा मृतदेह आढळून आला आहे. पवनी वन परिक्षेत्र अंतर्गत गुडेगाव बीटमध्ये एका वाघिणीला दोन बछडे असतांना तिने एका बछड्याला गुडेगाव बीट मधील जंगलात परित्यक्त केले. वन विभाग कर्मचाऱ्यांनी त्या बछड्याचे पोषण करून ज्या ठिकाणी वाघिणीने सोडले त्याच ठिकाणी वाघिणीची भेट होईल या आशेने ठेवले. संपूर्ण घटनाक्रमावर वन विभाग उप संरक्षक नजर ठेवून होते. मात्र आज सकाळ पर्यंत वाघीण आलीच नाही व त्या एकट्या नवजात बछड्याचा मृत्यू झाला. दुसरीकडे बीट गार्ड फुलसुंगे गस्तीवर असताना त्यांना एक नर अस्वल एका रापटयाच्या बाजूला मृतावस्थेत आढळून आले. त्यांनी वन परिक्षेत्र अधिकारी विजय राजुरकर यांना माहिती दिल्यानंतर विभागीय वन अधिकारी एस. बी. भलावी, जिल्हा मानद वन्यजीव रक्षक नदीम खान आणि शाहिद खान, पशु वैद्यकीय अधिकारी गुणवंत भड़के हे पोहोचले. तपासणीनंतर शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान चारही मृत्यूच्या कारणांचा शोध वनविभागाकडून घेतला जात आहे. तीन वाघांच्या बछड्यांचा आणि एका अहवालात झालेला मृत्यू वन्यप्रेमी आणि वन अधिकार्यांयसाठी मोठा धक्का आहे.

Leave a Reply