अमरावती : १२ मे – परवानाधारक हॉटेल व बार मालकांना करसवलत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडं पत्राद्वारे केली होती. त्या पार्श्वभूमीवर माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी पवारांना खुलं पत्र लिहिलं आहे. ‘दारूवाल्यांसाठी तुम्ही कळकळीनं पत्र लिहिलंत. त्यामुळं तुम्हाला त्यांचे आशीर्वाद मिळतीलच, पण त्याच धर्तीवर शेतकरी, शेतमजूर व बारा बलुतेदारांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहा,’ अशी विनंती बोंडे यांनी शरद पवारांना केली आहे.
बोंडे यांचं हे पत्र सध्या चांगलंच व्हायरल झालं आहे. ‘महाराष्ट्रातील दीड कोटी शेतकरी देखील सध्या अडचणीत आहेत. शेतमजूर सुद्धा सरकारकडं आशेनं पाहत आहेत. बारा बालुतेदारांनाही जगण्यासाठी सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे. या लोकांकडं दारूवाल्यांप्रमाणे गडगंज मालमत्ता नाही. त्यांच्या मदतीसाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहायला हवं. मुख्यमंत्री तुमचं ऐकतात, तुमची मागणी नक्की पूर्ण होईल,’ असं बोंडे यांनी पत्रात म्हटलं आहे.
‘गावखेड्यातील शेतमजूर, वाजंत्रीवाले, नाभिकांसह सर्व बारा बलुतेदार आज आर्थिक संकटात आहेत. स्वतःचं कुटुंब पोसण्याचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मायबाप सरकार पुन्हा लॉकडाऊन वाढवणार आहे. अशा वेळी या सर्वांना मदतीची गरज आहे. करोनाच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधान मोदींनी सहा हजार रुपये टाकले. महाराष्ट्रातील अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक अशा ९४ लाख शेतकऱ्यांना त्यामुळं आधार मिळाला. पण, ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यात दमडीही टाकली नाही. ९४ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांची माहिती ठाकरे सरकारकडं आहे. या खात्यांमध्ये त्यांनी सहा हजार रुपये टाकणं गरजेचं आहे. त्यासाठी पवार साहेबांनी पत्र लिहावं.
‘करोनामुळं कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आहेत. धान्य, कांदा, भाजीपाला सुद्धा विकता येत नाही. अवकाळीची नुकसान भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला आणि १० हजार रुपये हेक्टरवर बोळवण केली. अतिवृष्टीचे निकष लावून अवकाळीनं बाधित शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आलं. गेल्या दोन महिन्यांत विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा अवकाळी पाऊस, वादळं झालीत. शेतकऱ्यांचा कांदा, आंबा याचं अतोनात नुकसान झालं. परंतु सरकारनं साधी दाखलही घेतली नाही. या अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहा.
करोना काळातील घरगुती वीज बिल माफ करू. अशी घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. मात्र, पहिली लाट ओसरताच महावितरणनं निर्दयीपणे सर्वसामान्यांचं वीज कनेक्शन कापण्यास सुरुवात केली. ऊर्जामंत्र्यांनी शब्द फिरवले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी तोंडाला कुलूप लावले. आणि आता तर पुन्हा लॉकडाऊन लावला. मजुरी नाही, रोजगार नाही. रोजच्या खाण्यापिण्याचा संघर्ष सुरू आहे. त्यामुळं गोरगरिबांचे वीज बिल माफ करण्यासाठी पत्र लिहा.