मुख्याध्यापक आणि लिपिकाला लाच घेतांना अटक

नागपूर : ११ मे – निवृत्ती वेतनासाठी शाळेतील नाहरकत प्रमाणपत्राची निवृत्त शिक्षकाने शाळेच्या मुख्याध्यापकांना मागणी केली. त्यासाठी मुख्याध्यापकाने आणि वरिष्ठ लिपिकाने निवृत्त शिक्षकाला २0,५00 रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी निवृत्त शिक्षकाने लाचलुचपत विभागाकडे केलेल्या तक्रारीवरून प्रागतिक माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक आणि वरिष्ठ लिपिकावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली.
प्राप्त माहितीनुसार, ओमनगर, प्रीती सोसायटी, कोराडी येथे राहणारे तक्रारदार हे प्रागतिक माध्यमिक विद्यालयातून सहाय्यक शिक्षक पदावरून ३१ ऑगस्ट २0२0 ला सेवानवृत्त झाले. नियमाप्रमाणे तक्रारदाराचा निवृत्ती प्रस्ताव ते निवृत्त होण्याच्या ६ महिने आधी कार्यालय शिक्षणाधिकारी माध्यमिक जि.प. येथे पाठविणे बंधनकारक होते. पण, शाळेचे मुख्याध्यापक अनिल रामधन सगणे (५७) आणि वरिष्ठ लिपिक प्रशांत वामन कुरळकर (५२) यांनी तक्रारदार यांचा निवृत्ती वेतन प्रस्ताव पाठविलाच नाही. त्यासंबंधाने तक्रारदार मुख्याध्यापक सगणे यांना भेटले. सगणे यांनी यासंदर्भात वरिष्ठ लिपिक कुरळकर यांना भेटण्यास सांगितले. तक्रारदार हे कुरळकर यांना भेटले असता त्यांनी तक्रारदार यांना मुद्दा क्र. ५, ६, ७, ८, ९ आणि १४ भरून शाळेतील नाहरकत प्रमाणपत्रासह निवृत्ती वेतन मंजूर होण्याकरिता कोषागार कार्यालयात सादर करण्यास सांगितले. तक्रारदाराने संबंधित विवरणपत्र भरून दिले. त्यानंतर नाहरकत प्रमाणपत्रासाठी त्यांनी मुख्याध्यापक आणि वरिष्ठ लिपिक यांना विनंती केली. पण, मुख्याध्यापक आणि वरिष्ठ लिपिक यांनी शाळेतील मेंटेन्सकरिता २0,५00 रु. लाचेची मागणी केली. तक्रारदरांना मुख्याध्यापक आणि वरिष्ठ लिपिकाला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे अधिकार्यांना भेटून तक्रार केली. लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक सारंग मिराशी यांनी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीची गोपनीयरित्या शहानिशा करून मुख्याध्यापक अनिल सगणे आणि वरिष्ठ लिपिक प्रशांत कुरळकर यांच्याविरुद्ध सापळा कारवाईचे आयोजन केले. त्यामध्ये पडताळणी दरम्यान तक्रारदारास ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी शाळेतील मेंटेन्ससाठी २0,५00 रु. लाचेची मागणी केली. मुख्याध्यापक अनिल सगणे यांनी प्रागतिक माध्यमिक विद्यालय कोराडी येथील कार्यालयात पंचासमक्ष लाच स्वीकारल्याने त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. त्यावरून मुख्याध्यापक आणि वरिष्ठ लिपिकावर कोराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Reply