जळगाव : ११ मे – जळगावच्या जामनेर तालुक्यातील गारखेडा परिसरात घराला आग लागून दाम्पत्याचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. उत्तम श्रावण चौधरी (४७) व वैशाली उत्तम चौधरी (४४) अशी मृत पती पत्नीची नावं आहेत.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातल्या गारखेडा इथं उत्तम चौधरी आणि त्यांची पत्नी वैशाली चौधरी हे दाम्पत्य राहत होतं. मध्यरात्री दोन वाजेच्यानंतर त्यांच्या घराला आग लागली. आगी लागली त्यावेळी चौधरी दाम्पत्य घरात झोपलेलं होतं. त्यामुळे घराला आग लागल्याने या आगीत होरपळून दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घराला आग लागली याची माहिती गावातही कोणाला मिळाली नव्हती. त्यामुळे लवकर कोणीही मदतीला जाऊ न शकल्याने त्यांचा घरातच मृत्यू झाला.
पहाटेच्या सुमारास या ठिकाणाहून एक ट्रक चालला होता. त्या ट्रकचालकाला आग लागलेली दिसली, तेव्हा त्याने गावातील लोकांना झोपेतून उठवलं आणि चौधरी यांच्या घराला लागलेल्या आगीच्याबाबत त्यांना माहिती दिली. गावकऱ्यांनी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. घराचा दरवाजा उघडण्यासाठीही अनेक प्रयत्न केले. मात्र, दरवाजा आतून बंद असल्याने त्यांन शक्य होत नव्हते. अखेर दरवाजा तोडून सर्वांनी घरामध्ये प्रवेश केला. पण तोपर्यंत उशीर झालेला होता. या आगीत होरपळून या दाम्पत्याचा मृत्यू झाला.
आग नेमकी कशी लागली यामागचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. उत्तम चौधरी आणि वैशाली चौधरी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. या दोघांचाही विवाह झालेला आहे. घराला आग लागली त्यावेळी घरामध्ये फक्त हे दोघेच होते.