नवी दिल्ली : ११ मे – राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी एक पत्र लिहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक सल्ला दिला आहे. देशात तेजीनं फैलावणाऱ्या करोना संक्रमणाला रोखण्यासाठी कोविड लसीचं उत्पादन वाढवणं आवश्यक आहे. यासाठी लस तयार करण्याचा फॉर्म्युला इतर लस निर्मात्या कंपन्यांनाही देऊन मोठ्या प्रमाणात लस निर्माण करण्याचा प्रयत्न केला जावा. यामुळे राज्यांच्या गरजा पूर्ण होण्याशिवाय देशात लसीकरण मोहिमेला गती मिळू शकेल, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय.
आपण सध्या सव्वा लाख लसीचे डोस देत आहोत. लवकरच ही संख्या ३ लाखांवर पोहचण्याचं लक्ष्य आपल्यासमोर आहे. परंतु, लस उपलब्धीची मोठी समस्या आपल्यासमोर उभी आहे. देशात युद्ध स्तरावर लस उत्पादन करण्याची आवश्यकता आहे. यासाठी लस निर्मितीचं काम केवळ दोन कंपन्यांकडे राहू नये. आपल्या केवळ काही दिवस पुरेल एवढाच लससाठी उपलब्ध आहे आणि ही देशव्यापी समस्या आहे, अशी चिंताही यावेळी अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली.
त्यामुळे, लस तयार करण्याचं काम केवळ दोन कंपन्यांवर सोपवण्यापेक्षा या कामासाठी इतर कंपन्यांचीही मदत घ्यायला हवी. केंद्र सरकारनं या कंपन्यांकडून लस तयार करण्याच फॉर्म्युला घेऊन तो इतर कंपन्यांसाठी उपलब्ध करून द्यायला हवा. त्यामुळे आपण कमी वेळेत जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेऊ शकतो. असा विश्वास दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
सोबतच, लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादनाचा एक भाग मूळ कंपन्यांना रॉयल्टी म्हणून देऊ शकतो, असा प्रस्तावही केजरीवाल यांनी मांडलाय.
करोना संक्रमण देशात दाखल झालं तेव्हा पीपीई कीटची कमतरता भासत होती. काही कंपन्यांकडेच हे काम असतं तर ही कमतरता कायम राहिली असती. आज मात्र पीपीई कीटची कमतरता नाही, याची आठवणही त्यांनी करून दिली.