नागपूर : १० मे – आजूबाजूला दुकान लावणे आणि मटनाचे भाव कमी करण्यावरून झालेल्या वादावादीत पाटणकर चौक येथे राहणार्या जगदीश मदने (४५) या मटन विक्रेत्याची हत्या केल्याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. राजू कटारे आणि कुणाल बावणे अशी आरोपींची नावे आहेत.
मृतक जगदीश आणि राजू कटारे हे नातेवाईक आहेत. दोघेही पाटणकर चौकात मटनाचे दुकान लावत होते. जगदीशचे दुकान जरीपटका हद्दीत तर राजूचे दुकान कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत होते. राजूच्या दुकानाच्या बाजूलाच जगदीशच्या भावाचे मटनाचे दुकान होते. जगदीशचा भाऊ आणि राजूचे दुकान शेजारी असल्याने ग्राहकांना आपल्याकडे ओढण्यासाठी ते मटनाचे भाव कमीजास्त करीत असत. जगदीशच्या भावाच्या दुकानात कमी किमतीत मटन मिळत असल्याने ग्राहकांची गर्दी असायची. मटनाचे भाव पाडण्यावरून जगदीशचा भाऊ आणि राजू यांच्यात मागील काही दिवसांपासून कुरबुर सुरू होती.
याच कारणावरून रविवारी सकाळी 11 च्या सुमारास त्यांच्यात किरकोळ वाद झाला होता. वाद करून आरोपी निघून गेले होते. दुपारी 2.30 च्या सुमारास आरोपी राजू, कुणाल, विक्की आणि बंटी हे जगदीशच्या दुकानात आले. पुन्हा त्यांच्यात वाद झाला. या वादावादीत राजू आणि कुणाल यांनी मटन कापण्याच्या सुर्याने जगदीशच्या पार्श्वभागावर वार करून त्याला रक्तबंबाळ केले. जगदीशचा भाचा शुभम शेंडे हा मधात पडला असता आरोपींनी त्याला मारहाण करून जखमी केले. गंभीर अवस्थेत जगदीशला मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
जरीपटका पोलिसांना या घटनेची माहिती समजताच पोलिस उपायुक्त निलोत्पल, जरीपटक्याचे पो. नि. नितीन फटांगरे आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शोधमोहिम राबवून राजू आणि कुणाल यांना अटक केली. जरीपटका पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.