नंदुरबार : १० मे – कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात ठिकठिकाणी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. तर काही ठिकाणी कडक निर्बंध लादण्यात आले आहे. अशातच रमझानचा महिना सुरू असल्यानं नमाज पठणासाठी मुस्लीम बांधव मशिदीत जात आहेत. अलीकडेच पार पडलेल्या कुंभमेळ्यामुळे कोरोनाचा प्रसार वाढल्याची घटना ताजी असताना आता रमझानमुळे कोरोना फैलावण्याचा धोका वाढला आहे. हा धोका लक्षात घेऊन मशिदीत गर्दी करू नका, असं सांगत नमाज पठण करण्यापासून रोखल्यानं दोन मुस्लीम गटात तुंबळ हाणामारी झाली आहे.
लोखंडी रॉड, लाकडी दांडे आणि हॉकी स्टिकनं हल्ला करत दोन्ही गटांनी एकमेकांची डोकी फोडली आहेत. या हाणामारीत दोन्ही गटातील 6 जण जखमी झाले आहेत. हा प्रकार नंदुरबार शहरातील चिराग अली मशिदीसमोर घडला. सध्या याठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तर पोलिसांनी अद्याप 12 जणांना अटक केली असून अन्य 9 जणांचा शोध घेतला जात आहे.
वृत्तानुसार, 8 मे रोजी रात्री शहरातील मुस्लीम बांधव चिराग अली मशिदीसमोर नमाज पठणासाठी जमले होते. यावेळी आवाहन करण्यात आलं होतं की, मशिदीसमोर गर्दी करू नका. आतमध्ये एकावेळी फक्त पाच जणांनाच प्रवेश आहे. नमाज पठण करण्यापासून रोखल्यामुळे एक जमाव दुसऱ्या जमावावर धावून गेला. त्यानंतर काही काळा दोन्ही गटात बाचाबाची सुरू झाली आणि याचं रुपांतर तुंबळ हाणामारीत झालं.
तुम्ही आम्हाला नमाजासाठी मशिदीत जाण्यापासून रोखलं कसं काय? असा जाब विचारत एका गटाने लोखंडी रॉड, लाकडी दांडे आणि हॉकी स्टिकने दुसऱ्या गटावर हल्ला केला. तेंव्हा समोरच्या गटानेही प्रतिहल्ला चढवला. नमाजपठणावरून झालेल्या या हाणामारीत एकूण सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध फिर्याद दिली असून पोलिसांनी आतापर्यंत 12 जणांना अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.