संपादकीय संवाद – कोरोना लसीबाबतचा अपप्रचार निरर्थकच

कोरोनापासून वाचायचे असेल तर कोरोनाची लस घेणे गरजेचे आहे असा प्रचार सर्वच स्तरातून होतो आहे त्याचवेळी कोरोनाची लस घेण्यासाठी नागरिकही उत्साहाने जात असल्याच्या बातम्या येत आहेत ठिकठिकाणी लसीचा तुटवडा असल्याचेही कानावर येत असून लस व्यापक प्रमाणात मिळावी आणि कुणीही लसीकरणाशिवाय राहू नये या दृष्टीने सर्व प्रयत्न होतांना दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर कानावर येणाऱ्या काही विपरीत बातम्या मन अस्वस्थ करून सोडणाऱ्या आहेत, कोरोनाची लस घेऊ नका असा प्रचार काही हितसंबंधी घटकांकडून जनसामान्यांमध्ये विशेषतः ग्रामीण किंवा तळागाळातील नागरिकांच्या वस्त्यांमध्ये केला जात असल्याचे दिसून आले आहे. परिणामी अनेक अशिक्षित नागरिक आम्हाला व्हॅक्ससीन घ्यायचे नाही, अशी ठाम भूमिका घेतांना दिसत आहेत. त्यासाठी त्यांना विविध कारणेही पढवण्यात आलेली असल्याचे दिसून येते कोरोनाची लस घेतल्यामुळे कोरोना कधीच बरा होत नाही किंवा कोरोना होणारच नाही असे नाही तर ही लस घेतल्यामुळे चांगली प्रकृती बिघडण्याची भीती आहे असेही या तळागाळातील मंडळींच्या मनावर भरवण्यात आल्याचे लक्षात येते त्याचबरोबर या लसीने नपुंसकत्व येते असाही प्रचार झाल्याची माहिती मिळते त्यामुळे अनेक लोक लसीकरण टाळण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहेत.
वस्तुतः कोरोनाची लस घेतली तर कोरोना होणारच नाही असे नाही मात्र कोरोना झाल्यामुळे जीवावर बेतण्याचा धोका कमी होईल असे वारंवार तज्ज्ञ मंडळी स्पष्ट करीत आहेत. कोरोनाची लस घेतल्यानंतरही कोरोना साथीच्या काळात मास्क वापरणे , परस्परांपासून दूर राहणे अश्या प्रकारच्या सर्व सूचनांचे पालन करावेच लागणार आहे. तरीही कोरोना तुमच्याजवळ आलाच तर लस घेतली असल्यास तुमच्या जीविताला असलेला धोका कमी होणार आहे हे वारंवार स्पष्ट करण्यात आलेले आहे. तरीही अपप्रचाराचे बळी पडत आहेतच.
कोरोनाची लस घेतल्यावर प्रकृती बिघडते असा दावाही कोरोना विरोधक करीत आहेत तसा विचार केल्यास अश्या प्रकारची कोणतीही प्रतिबंधात्मक उपाययोजना करणारी लस घेतल्यास काही काळ ताप येणे, हातपाय दुखणे असे प्रकार होतातच सुमारे ५० वर्षांपूर्वी आपल्या देशात सरसकट कॉलरा, देवी, मलेरिया अशा रोगांसाठी विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात व्यापक प्रमाणात लसीकरण केले जायचे त्यावेळी कॉलराची लस घेतली की दोन दिवस तरी ताप यायचाच अनेकदा ज्या हातावर लस घेतली तो हातही सुजून यायचा आणि ठणकायचा मात्र हे दोन दिवस उलटले की नंतर समस्या नसायची अर्थात लस घेतली असली तरी आवश्यक ती काळजी घ्यावी लागायचीच आज साठीच्या घरात असलेल्या नागरिकांना हे सर्व निश्चित आठवेल.
या पार्श्वभूमीवर काल एक सकारात्मक बातमी आली आहे कोणतीही नवी लस किंवा नवे औषध तयार झाले की त्याचा प्रयोग सर्वप्रथम प्राण्यांवर केला जातो पुण्यात कोरोनाच्याच काही नवीन औषधी लसीच्या स्वरूपात तयार करण्यात आल्या त्याची चाचणी घेण्यासाठी त्यांना माकडांची गरज होती त्या परिसरात माकडे न मिळाल्यामुळे सदर शास्त्रज्ञांनी राज्यशासनाच्या वनविभागाला माकडे पुरविण्याची विनंती केली वनविभागाने नागपूरच्या आसपासच्या परिसरातून काही माकडे पकडून पुण्याला पाठवली त्या माकडांवर लसींचे आवश्यक ते सर्व प्रयोग करण्यात आले त्यानंतर काही दिवस जाऊ देऊन त्या माकडांची वैद्यकीय चाचणी केली गेली त्यावेळी ती माकडे ठणठणीत असल्याचे लक्षात आले या माकडांना पुण्याहून कालच नागपुरात आणण्यात आले आणि त्यांना परत जंगलात सोडण्यात आले आहे.
जर माकडांना काहीही इजा होत नाही तर माणसांनी अशी लस घेण्यासाठी का घाबरावे? हाच खरा कळीचा मुद्दा आहे. ही लस सर्व निकषांवर तपासली गेली आहे राष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांनी त्यांना मान्यता दिली आहे अश्या वेळी गावातील चार दीडशहाण्या भोपनजींच्या सांगण्यावर विश्वास ठेऊन आयुष्यभराचे नुकसान करून घ्यायचे का? हे ठरवण्याची वेळ आता आली आहे . कोरोनाचे संकट हे दीर्घकाळ चालणार आहे त्याच्यावर मात करायची असेल तर कोरोनाची लस ही घ्यायलाच हवी त्याचसोबत या लसीबाबत अपप्रचार करणाऱ्यांवरही कारवाई करणे गरजेचे झाले आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply