गोंदिया : ९ मे – शेतावरील मांडवात बांधून असलेल्या चार म्हशींवर वीज कोसळ्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील नवेगाव कला येथे दुपारच्या सुमारास घडली.
मागील चारपाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाळी स्थिती निर्माण होत आहे. वेळी-अवेळी विजांच्या गडगडाटासह वादळी पावसाला सुरवात होते. दुपारी 1 वाजेच्या सुमारास आकाशात काळे ढग एकवटून गडगडाटासह वादळी पावसाला सुरवात झाली. दरम्यान शेतकरी वासूदेव ब्राम्हणकर यांनी त्यांच्या शेतातील मांडवात बांधलेल्या म्हशींवर वीज कोसळल्याने चार म्हशींचा दुर्दैवी अंत झाला. घटनेची माहिती मिळताच तलाठी बूचे, सरपंचा साधना गजभिए, नितेश गडपायले यांनी घटनास्थळावर पोहचून पंचनामा केला. या घटनेमुळे ब्राम्हणकर यांचे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले. दुभत्या म्हशी दगावल्याने ब्राम्हणकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामवासीयांनी केली आहे.