मुंबई : ९ मे – राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. यावर विरोधकांनी केवळ राजकीय टीका न करता राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील यासाठी केंद्राला एखादं पत्र लिहावं, असा सल्ला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिला आहे. रोहित पवारांनी ट्वीट करत विरोधकांवर निशाणा साधला.
“कोविडच्या लढ्याबाबत पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचं कौतुक केलं, त्यामुळं राज्यातील विरोधकांनी केवळ राजकीय टीका न करता राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्रालाही जरुर लिहावं!” असे ट्वीट रोहित पवारांनी केले आहे.
“कोविडच्या मृतांची आकडेवारी लपवण्याबाबत बोलायचं तर आज हे भाजपशासित राज्यांना सांगण्याची खरी गरज आहे. कोविडचा हा लढा संपलेला नाही. त्यामुळं राजकीय टीका-टिप्पणी टाळून सर्वांनाच हा लढा एकत्रित लढावा लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न करुयात!” असेही रोहित पवार म्हणाले.
राज्यात काल दिवसभरात 53 हजार 605 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर त्याचवेळी 82 हजार 266 रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण कोरोनामुक्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे राज्यासाठी हा खूप मोठा दिलासा आहे. मुख्य म्हणजे यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा 6 लाख 28 हजार 213 इतका खाली आला आहे.