रेमडेसीवीरच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये पाणी भरून विकण्याचा प्रकार उघडकीस

बुलडाणा : ९ मे – राज्यावर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी आरोग्य यंत्रणा जीवाची बाजी लावून काम करत आहे. पण, अशा परिस्थितीही पैशाच्या हव्यासापोटी काही जण काळाबाजार करत आहे. बुलडाण्यात चक्क रेमडेसीवीर इंजेक्शनच्या रिकाम्या कुप्यात पाणी भरून काळाबाजार केला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे, रुग्णालयाचा वॉर्ड बॉयच हा काळाबाजार करत होता.
बुलडाणा जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शन्सचा काळाबाजार होत असल्याबाबत अनेक तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने बुलडाणा गुन्हे शाखेच्या वतीने शहरात या इंजेक्शन्सची काळाबाजारी करणाऱ्या ३ जणांना अटक करण्यात आली होती. हे तिघे जण बुलडाणा शहरातील नामांकित डॉ. मेहेत्रे व डॉ लद्दड यांच्या हॉस्पिटलचे वॉर्ड बॉय आहेत.
रेमडेसीवीर इंजेक्शन्सचा काळाबाजार करत असताना पकडण्यात आलेल्या तीन जणांकडून रेमडेसीवीर इंजेक्शन्सच्या रिकाम्या कुप्यात पाणी भरून रुग्णांच्या नातेवाईकांना विकले जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 15 ते 20 हजार रुपयांमध्ये रेमडेसीवीर इंजेक्शनची विक्री केली जात होती.
या हॉस्पिटलमध्ये वापरल्या गेलेले रेमडेसीवीर इंजेक्शन्सच्या रिकाम्या कुप्यात पाणी भरून रुग्णांच्या नातेवाईकांना विकत असल्याची आरोपींनी कबुली दिली आहे.
त्यामुळे या पाण्याने भरलेल्या रेमडेसीवीरच्या कुप्या किती जणांना विकल्या व त्याचा किती रुग्णांवर वापर करण्यात आला आहे, हे ही तपासावं लागणार आहे. ह्या संपूर्ण किळसवाण्या प्रकारामुळे कोरोना काळात माणुसकी ओशाळली असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केल्या जात आहे.

Leave a Reply