नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये निवासी डॉक्टरांना मारहाण, निवासी डॉक्टर संपावर

नागपूर : ९ मे – नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) दोन निवासी डॉक्टरांना रुग्णालयाच्या बाहेर काही अज्ञात तरुणांनी मारहाण केल्याने निवासी डक्टर संतापले असून, जोवर आरोपींना अटक होत नाही, तोवर मेडिकलमध्ये सुरू असलेली निवासी डॉक्टरांची सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डॉ. सादुल्ला व डॉ. फराज अशी या घटनेत जखमी डॉक्टरांची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. सादुल्ला व डॉ. फराज हे दोघे रुग्णालयाला लागून असलेल्या मेडिकल चौकात फळे विकत घ्यायला गेले होते. सध्या त्यांचा रोजा सुरू आहे. तेथे दुचाकीवर बसताना एका तरुणाला त्यांचा धक्का लागला. त्यामुळे त्याने आधी शिवीगाळ व नंतर मारहाण सुरू केली. नंतर त्याचे तीन- चार मित्रही तेथे आले. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना हे डॉक्टर आहेत असे सांगताच ते आणखी आक्रमक झाले. ‘तुम्ही डॉक्टर आहात. तुम्हीच कोविड रुग्णांना मारता’, असे म्हणत त्यांनी परत मारहाण सुरू केली. यात डॉ. सादुल्ला यांच्या डोक्याला मार लागला. काही वेळातच मारहाण करणारे तरुण तेथून पळून गेले.

याबाबत कळताच मेडिकलमधील निवासी डॉक्टर संतापले. त्यांनी लगेच अजनी पोलीस स्टेशन गाठून या घटनेची तक्रार दिली. सध्या कोविड संसर्गामुळे डॉक्टर दिवस रात्र सेवा देत आहेत. ज्या डॉक्टरांना मारहाण झाली तेही कोविड वॉर्डात कार्यरत आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर काम करीत असताना त्यांना झालेल्या मारहाणीचा मार्डने निषेध केला आहे. मारहाण करणाऱ्या तरुणांना जोवर अटक होत नाही तोवर मेडिकलमधील सेवा बंद करण्याचा निर्णय मार्डने घेतल्याची माहिती मार्डचे अध्यक्ष
डॉ. अर्पित धकाते यांनी दिली. त्यानुसार रात्री ८ नंतर सेवा बंद केल्याचेही त्यांनी सांगितले. आरोपींना अटक होताच आम्ही आमची सेवा सुरू करू, असेही डॉ. धकाते यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply