नागपूर : ९ मे – कोरोनाचा प्रकोप पाहता तिसरी लाट येण्यापूर्वी सर्वांचे लसीकरण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स, औषधे उपलब्ध करून दिली जात असून विदर्भात त्याची उपलब्धता वाढविली जात असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.
भारतीय जनता पार्टीच्या नागपूर महानगर कार्यकारिणीची व्हच्यरुअल बैठक पार पडली. यावेळी माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. सेवाकार्यात भाजपा देत असलेले योगदान, रक्तदान, प्रत्येक बुथ कोरोनामुक्त करण्यासाठी अभियान आणि एकूणच संघटनात्मक कार्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना मुंबईबाहेर आणि उपमुख्यमंत्र्यांना पुण्याबाहेर महाराष्ट्र आहे, याची जाणीव नसल्याने अन्य जिल्ह्याची स्थिती चिंताजनक असल्याचा प्रहार केला. ना. गडकरी यांनी स्वत: मैदानात उतरून ऑक्जिसन आणि अन्य सोईसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे आता स्थिती नियंत्रणात आहे. कोरोनातून मुक्त झालेल्यांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तिसरी लाट येण्यापूर्वी सर्व यंत्रणा सज्ज असायला हव्या, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. महापौर दयाशंकर तिवारी यांनी कोविड काळात महापालिकतर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी प्रास्ताविक केले. शहरातील सहा विधानसभा क्षेत्रात संघटनेतर्फे कोविड काळात केल्या जात असलेल्या उपाययोजनांची व सेवाकार्याची माहिती त्यांनी दिली. संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना एकमेकांची मदत करण्याचे आवाहन केले. महानगर संघटनमंत्री सुनील मित्रा यांनी सेवाकार्याची माहिती दिली.
याप्रसंगी खा. विकास महात्मे, प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे, सुनील देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. गिरीश व्यास, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते यांच्यासह संपूर्ण कार्यकारिणीचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित हेाते. आभार प्रदर्शन नरेंद्र बोरकर यांनी केले.