तिसरी लाट रोखण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करा – डॉ. नितीन राऊत यांची सूचना

नागपूर : ९ मे – करोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रासह देशात धुमाकूळ घातलेला असताना तिसऱ्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शासन-प्रशासन सतर्क झालं असून नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत.
‘महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये ओसरलेली लाट पुन्हा उग्र झाली आहे. तज्ञांच्या मते पुन्हा नागपूर शहर व ग्रामीण भागात तिसऱ्या लाटेची शक्यता निश्चित आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी मी जबाबदार म्हणून स्वतःची जबाबदारी पार पाडावी. नागपूर शहर व ग्रामीण भागात कमीत कमी नागरिकांना कोरोनाची लागण व्हावी व मृत्यू संख्या नियंत्रणात राहावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने तिसरी लाट रोखण्यासाठी मास्टर प्लान तयार करावा. त्यामध्ये महत्त्वाचे निर्णय कालमर्यादेत पूर्ण करावे,’ अशा स्पष्ट सूचना ऊर्जामंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शनिवारी दिल्या.
‘गेल्या वर्षभरात सतराशे बेडवरून सुमारे ९ हजार बेड आम्ही निर्माण केले. मोठ्या प्रमाणात कोविड हॉस्पिटलची सुरुवात केली. ऑक्सिजनची मुबलक उपलब्धता होईल यासाठी थेट हवाईदलापासून रेल्वे पर्यंत मदत घेतली. मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. आरोग्यविषयक मनुष्यबळातही वाढ केली आहे. वर्षभरात केवळ आरोग्यावर काम सुरू असून नागपूर जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक दशलक्ष रुग्णसंख्येमागे साधारण बेड, आयसीयू बेडसह व्हेंटिलेटरच्या उपलब्धतेत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांना मागे सोडले आहे. मात्र तरीही तज्ञ व शास्त्रज्ञांच्या मते येणारी तिसरी लाट ही अतिशय गंभीर असेल. यामध्ये ही यंत्रणा देखील तोकडी पडू शकते. त्यामुळे युद्धस्तरावर कामाला लागा. तिसऱ्या लाटेसाठी सज्ज व्हा,’ असा इशाराही नितीन राऊत यांनी उच्चस्तरीय बैठकीत दिला.

या बैठकीमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांसंदर्भातील माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिली. जिल्ह्यामध्ये ज्या गावांमध्ये कमी प्रमाणात लसीकरण झाले आहे व ज्या गावांमध्ये कोरोनाचा उद्रेक अधिक झाला आहे. त्याची यादी तयार करण्यात आली असून स्थानिक नागरिकांशी चर्चा करण्यासाठी थेट तहसीलदार व सर्व संबंधित यंत्रणा गावागावात पोहोचणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. कोरोना संसर्गसंदर्भातील जनजागृती व संबंधित गावातील लसीकरण व पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

Leave a Reply