आत्मबळ मिळावे यासाठी संघाचा पॉझिटिव्हिटी अनलिमिटेड हा कार्यक्रम

नवी दिल्ली : ९ मे – कोरोनाच्या संकटात सापडलेल्या नागरिकांना आत्मबळ मिळावं यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘पॉझिटिव्हिटी अनलिमिटेड’ नावाने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. टीव्हीवरून हा कार्यक्रम दाखविण्यात येणार आहे. विप्रोचे चेअरमन अजीम प्रेमजी, इन्फोसिस फाऊंडेशनच्या चेअरमन सुधा मुर्ती आणि सरसंघचालक मोहन भागवत या कार्यक्रमाला संबोधित करून देशाच्या नागरिकांचं आत्मबळ वाढवणार आहेत.
या कार्यक्रमात सदगुरू जग्गी वासुदेव, श्री श्री रविशंकर, निर्मल संत आखाडाचे ज्ञानदेवजी आणि तिरपंथी जैन समाजाचे जैन मूनी प्राणनाथ या चार दिवसीय कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. चार दिवस प्रत्येक दिवशी दोन व्यक्ती 15 मिनिटं चर्चेत सहभागी होणार आहे. या संकटाच्या काळात पॉझिटिव्ह राहता यावं आणि सर्वांनी एकजूट होऊन कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करावा, यासाठी हा कार्यक्रम होणार आहे.
जनतेचं मनोबल उंचावणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तसेच महामारिशी मुकाबला करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणंही त्यामागचा हेतू आहे. आपण लढाई जिंकू शकतो, ही आशा लोकांमध्ये आम्हाला निर्माण करायची आहे, असं संघाच्या कोविड रिस्पॉन्स टीमचे संयोजक निवृत्त लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग यांनी सांगितलं. संघाच्या कोविड रिस्पॉन्स टीमनेच या कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे.

Leave a Reply