सीमा शुल्क विभागाने केले १०० कोटी रुपयाचे हेरॉईन जप्त

चेन्नई : ८ मे – चेन्नईतील अण्णा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागानं आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केलीय. या कारवाईत तब्बल १५.६ किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. सीमा शुल्क विभागानं जप्त केलेलं हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल १०० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय. या प्रकरणात दोन विदेशी नागरिकांना अटक करण्यात आलीय. हे दोघेजण तंजानियाचे नागरिक असल्याची माहिती मिळतेय. त्यातील एक महिला आणि एक पुरुष आहे.
सीमा शुल्क विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे दोघेजण कतार एअरवेजच्या विमानाने जोहान्सबर्ग आणि दोहा मार्गे चेन्नई इथं दाखल झाले होते. अटक केलेल्या आरोपींची नावं डेबोरो एलिया (वय 46) आणि फेलिक्स ओबाडिया (वय 45) आहे. चेन्नई विमानतळावरील सीमा शुल्क आयुक्त राजन चौधरी यांनी सांगितलं की, ड्रग्सचा व्यापार वाढल्यानंतर सीमा शुल्क अधिकारी प्रत्येक वस्तूवर नजर ठेवून आहेत. आफ्रिकन देशांमधून भारतात ड्रग्सची तस्करी होत असल्याची माहिती सीमा शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानंतर सर्वजण अलर्टवर होते. संशय येताच दोघांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांच्याकडे चौकशी केली असताना त्यांनी उडाउडवीची उत्तरं दिली.
दोन्ही आरोपी चौकशी अधिकाऱ्यांना चकवा देत पसार होण्याच्या विचारात होते. मात्र अधिकाऱ्यांच्या सतर्कतेनं त्यांचा मनसुबा पूर्ण होऊ शकला नाही. अधिकाऱ्यांना संशय आल्यावर त्यांनी या दोघांकडील सामानाची चौकशी केली. हे दोघे प्रत्येकी 2 ट्रॉली बॅग घेऊन आले होते. बॅगच्या पृष्ठभाग प्लास्टिकने पॅक करण्यात आला होता. एका ट्रॉली बॅगमध्ये पाच प्लास्टिकचे पॅकेट ठेवण्यात आले होते, त्यात पावडर होती. जेव्हा या पावडरबाबत चौकशी केली तेव्हा ते हेरॉईन असल्याचं स्पष्ट झालं. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनची किंमत 100 कोटी रुपये आहे. एनडीपीएस कायद्यानुसार या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे

Leave a Reply