विमान अपघात सतर्कतेने टाळणाऱ्या सीआयएसएफ जवानाला बक्षीस जाहीर

नागपूर : ८ मे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी सायंकाळी इंधन भरण्यासाठी उतरलेल्या एअर अँम्ब्युलन्सचे एक चाक मुंबईकडे उड्डाण भरल्यानंतर धावपट्टीवर अचानक पडले होते. सीआयएसएफच्या जवानाने आपल्या सूक्ष्म निरीक्षणाने ही घटना पाहून सतर्क केल्याने मोठी दुर्घटना होताहोता टळली आहे. याबद्दल जवान रविकांत आवला यांना दहा हजार रुपये रोख बक्षीस आणि प्रशस्तीपत्र जाहीर करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून गुरुवारी सायंकाळी एअर अँम्बुलन्सने मुंबईकडे झेप घेतली आणि १२ व्या वॉच टॉवरवरून या विमानाकडे सूक्ष्म नजर ठेवून असलेले सीआयएसएफचे हवालदार रविकांत आवला काही क्षणासाठी चमकले. त्यांनी लगेच सीआयएसएफचे डेप्युटी कमांडर रवीकुमार जी. यांना अँम्बुलन्सचे चाक निखळून पडल्याची माहिती दिली. रवीकुमार यांनी तत्काळ एअरपोर्ट सिक्युरिटी अथॉरिटीसोबत संपर्क साधला. त्यानंतर मुंबई आणि औरंगाबाद एअरपोर्टला अलर्ट देण्यात आला. त्याचमुळे गुरुवारची मोठी संभाव्य दुर्घटना टळली. त्यानंतर हे विमान गुरुवारी रात्री मुंबई विमानतळावर सुखरूप उतरले. चाक का पडले, याचे कारण समजू शकले नाही.

Leave a Reply