चंद्रपूर : ८ मे – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गजराज नावाच्या हत्तीने गुरूवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आक्रमक होऊन धुम ठोकली आणि दरम्यान, मुख्य लेखाधिकारी प्रमोद गौरकार यांना ठार केले. त्यावर रात्रभर जवळपास 50 वनाधिकारी व कर्मचार्यांची नजर होती. पहाटेच्या सुमारास त्यास जेरबंद करण्यात यश आले. बोटेझरी तलावात अख्खी रात्री या गजराजने काढली. पहाटे मोठ्या शिताफिने त्याला पकडण्यात आले. सळाखीने बांधून ठेवण्यात आले असून, सद्यस्थितीत तो शांत आहे. त्याच्या वागणुकीवर निगराणी ठेवली जात असल्याची माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वनाधिकारी एस. भागवत यांनी दिली.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी कॅम्पमधील गजरात नावाचा हत्ती आक्रमक झाला होता. तेव्हा तेथून जात असलेले सहाय्यक वनरक्षक कुळकर्णी आणि मुख्य लेखाधिकारी प्रमोद गौरकार यांच्यावर त्याने हल्ला केला. या हल्लयात गौरकार मृत्यूमुखी पडले. मुख्य लेखाधिकारी यांच्यावर शोकमग्न वातावरणात शुक्रवारी स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. गौरकार यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहितीही भागवत यांनी दिली. दरम्यान, बोटेझरी परिसरातील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. सुदैवाने, आक्रमक गजराज गाव परिसरात भटकला नाही. तो तलावालगतच फिरत राहिला, असेही त्यांनी सांगितले.