राज्याचे लसीकरण अँप बनवण्याची परवानगी द्या – मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी

मुंबई : ८ मे – लसीकरण अँपवर नोंदणीपासून लसीची पहिली मात्रा घेईपर्यंत सध्या संपूर्ण देशात गोंधळाचं चित्र आहे. अनेकदा नोंदणी होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. त्यात नोंदणी झाली तर वेळ आणि दिवसाचा स्लॉट मिळण्यास अडचणी आहेत. करोना लसीकरणासाठी तयार करण्यात अँपमुळे सध्या लसीकरण केंद्रावर गोंधळाचं वातावरण निर्माण होत आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यासाठी नवं अँप तयार करण्याची परवानगी मागितली आहे. कोविन अँपमध्ये अनेक त्रुटी असल्याचं त्यांनी पत्रात लिहीलं आहे.
देशात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांच लसीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी कोविन अँपवर नोंदणी करणं आवश्यक आहे. मात्र लसींचा अपुरा पुरवठा आणि कोविन अँप हाताळताना येणाऱ्या अडचणींमुळे नागरिक वैतागले आहेत. अनेक ठिकाणी नोंदणी असूनही लस नसल्याने माघारी परतावं लागत आहे. काही ठिकाणी सर्वर डाऊन असल्यामुळेही गोंधळ उडाला आहे.
लस न घेताही लस मिळाल्याचा मॅसेज येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे गोंधळ टाळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्यांनाच लस मिळेल यासाठी ४ अंकी सुरक्षा कोड आणला आहे. आजपासून हा ४ अंकी सुरक्षा कोड लागू झाला आहे. लसीकरणाच्या स्लॉटसाठी ऑनलाईन बुकिंग केलेल्या नागरिकांनाच हे नवे फिचर लागू होईल.

Leave a Reply